अमृतसिद्धि हा योग मंगलचि जग सगळे गाय ॥
"महाभाग जन ! सुखं गम्यतां पुनर्दर्शनाय ॥"
जें जें नश्वर गेलें निघुनी काळाच्या पाठीं ॥
अमृत तेवढें उरलें केवल या दिवसासाठीं ॥
अंधाराची वाट कंठिली फिरलों संकष्टीं ॥
चार युगांची रात्र भोगिली या दिवसासाठीं ॥
रोज उगवला, रोज परतला, होउनि बहु कष्टी ॥
आनंदें रवि आज उगवला या दिवसासाठीं ॥
दक्षिणसागर होउनि घटिकापात्र निरभिमान ॥
मोजित होता या दिवसांचें मंगल घटिमान ॥
पहिला वहिला किरण पहाया या शुभ दिवसाचा ॥
गंगासिंधू धांवत होत्या आंदोलित हृदया ॥
या दिवसाच्या या सूर्याला अर्घ्योदक द्याया ॥
स्वस्ति वाचना सिंहगडावर चढला गगनांत ॥
थरथरुनी श्री तानाजीचा तो तुटका हात ॥
मंगल हृदया बघे पांचही करुनि प्राण गोळा ॥
पंजाबी सिंहाचा दुसरा फुटकाही डोळा ॥
व्यासवाल्मिकीकालिदास कवि आळवीत बसले ॥
या दिवसाच्या भूपाळीस्तव वाङ्मय तें तसलें ॥
योगिवृंदगिरिकंदरिं बसुनि लावुनि अवधान ॥
पाहत होते या दिवसाचें चिन्मंगल ध्यान ॥
आर्यभट्ट मिहिरादि काढुनी गगनाचा ठाव ॥
हुडकित होते या दिवसाचें एकरास नांव ॥
सोरठचा श्री सोमनाथही या दिवसासाठीं ॥
पडे त्रिस्थळीं फुटुनि लागताम महंमदी काठी ॥
तिष्ठत अठ्ठावीस युगांवर भीमेच्या कांठीं ॥
खडा पहारा पांडुरंग करि या दिवसासाठीं ॥
अठरा पद्में सेना योजुनि जलधीच्या पाठीं ॥
श्रीरामांनीं सेतु जोडिला या दिवसासाठीं ॥
अठरा अध्यायांची गीता एक मुक्तकंठीं ॥
रणीं गाइली श्रीकृष्णांनीं या दिवसासाठीं ।
फितुरगडावर आग लागली या दिवसासाठीं ॥
पानपतावर रक्त सांडलें या दिवसासाठीं ॥
पोट बांधुनी वेद राखिले सरस्वतीकांठीं ॥
पुण्याई ती सर्वहि केवळ या दिवसासाठीं ॥
जन्मा येतो बाळ टिळकहि या दिवसासाठीं ॥
जन्मति श्रीमान् पंचम जॉर्जहि या दिवसासाठीं ॥
* * *
तहनाम्यावर सही घालिताम करि खालीं मान ॥
दुसरा बाजीराव बघे वर धरुनी अभिमान ॥
* * *
न लगे दौलत, न लगे बरकत, नको कोहिनूर ॥
स्वदेश न लगे स्वराज्य न लगे हो सर्वहि चूर ॥
एक सांगणें एक मागणें तेंच लाखवार ॥
"मागुनि घ्यावी श्रीशिवबांची भवानि तलवार ॥
स्वदेशभूषा, स्वराज्यजननी सकाळें दाखवावी ॥
दावित दावित सौभाग्यश्री स्वदेशिं आणावी ॥
चहुं मुलखांतुनि नव खंडांतुनि मिरवित आणावी ॥
रायगडावर समाधिची मग पूजा बांधावी" ॥
म्हणेल जो तो ऐन जिवाचा देशभक्त कट्टा ॥
सर्वस्वाचा ताम्रपटचि तो, तोच अमरपट्टा ॥