जीव बोलतो पाणी पाणी
चिरकालाची तहान लागुनि;
अशी तपेली मजला देउनि, थट्टा करितां तेथें कसली ?
प्रवास करणेम फार दूरवर !
आद्याच्या पर्यंतापासुनि
अंताच्या आरंभामधुनी--
एक अनंतें माप घेउनी, कैक अनंतें जाणें भरभर !
विश्व कशाचें घेउनि बसलां ?
विश्व मला जें दिसतें, त्यांतिल
विश्वें तुमचीं अणुसम होतिल;
निजक्षणीं तें तुमच्या जिरविल, काळांचा बाजारच सगळा
प्रवास माझा असा भयंकर !
या विश्वाच्या मागुनि जाणें,
मागुनि सुटुनी पुढें धांवणें,
अथवा सर्वांठायिं पसरणें, आद्यंताचें कापुनि अंतर !
कडक कायदा धांवायाचा !
पाउल एकादें जरि चुकणें,
पहिल्यापासुनि पुन्हां धांवणें !
आपुल्याच वा भंवतीं फिरणे ! मार्ग कुठुनि मग सरावयाचा ?
आधीं असते पुष्कळ सोबत;
कितीक ’मी, मी’ मजला दिसती,
पुढें चालतां भरभर मरती;
मरुनी माझ्या ठायीं जगती, माझीच मला उरते संगत !
माझें मीपण फारच मोठें !
दुज्या रहाया जागा नाहीं,
एकलकोंडा म्हणुनी राही,
खोटें ’मी’ ही अंगिंच पाहीं, राहिल सोबत मग तो कोठें ?
मजा जाणाया मीच विचक्षण !
नसते परके आधिं जाणतों,
असत्या मलाच न परी बघतों;
मज ओळखतां इतर विसरतों, माझें सर्वच फार विलक्षण !
तर्हाच माझी विचित्र असली !
असला मी---तो प्रवास तसला !
कडक कायदा त्याचा असला.
तशा प्रवासीं मजला, अशी तपेली देतां कसली ?
अनंततेची तहान माझी,
मिळतां पाणीं वाढे उलटी,
अधिकचि पाणी---अधिकचि मोठी;
जलब्रह्म द्या परि तिजसाठीं, तरीच होइल मग ती राजी !
भांडीं असलीं कां मज देतां ?
भरतांना जीं होति रिकामी,
भरुनि ठेविलीं तरि कुचकामी,
पडतिल कोणाच्या तीं कामीं ? कधीं परत बोला हो घेतां !
वागविण्याचें उगाच ओझें !
करी प्रवासामाजीं खोटी,
फुटकि तपेली तुमची खोटी,
मृगजळ नसतें दावी खोटी, कधीं तिच्यांतुन नच गळलें जें !
मायेची ही खरी तपेली;
मृगजळ प्याया आंत उतरतों,
अफाट तरि मी त्यांतच बुडतों,
नसल्यामाजीं असतां जिरतों; नको मला ही असली मेली !
ब्रह्मांडाची करा तपेली !
माझी ओळख पाणि तिच्यांतिल,
कैक अनंतें तयांत जिरतिल,
माझ्यावांचुनि सारे विरतिल, शिरे तपेली ही अशा जलीं !
ब्रह्मांडाची खरी तपेली;
करा रिकामी तरिही भरली,
भरुनी भरणें भरवुनि उरली,
जिरतिल विश्वें कितीक असलीं, कांठबरी जरि आधीं भरलीं !
माझी ओळख विचित्र पाणी;
जुनि ओळख मग नवीस आणी,
पाण्या वी अव्याहत पाणी,
पाण्यांतहि मग खेळे पाणी, हाय ! कसें हें कोणि न जाणी !
ब्रह्मांडाची करा तपेली;
तृषा नाहिंशी तिनें करीन,
तपेलीसही जलिं भरवीन;
प्रवासही जलिं जिरवीन, नको मला ही असली मेली !
प्रकार घ्या हा मनिं एकंदर;
सर्वस्वाची करा तपेली;
माझ्या पाण्यानें भरलेली,
पाहुनि तिजला तीन्ही काळीं, खुबी ओळखा क्या है अंदर !