दयाघना ! विनति करित मन तुज हें चिरविरहें तापतां !
धन्य विश्वरचना ही । यथासांग सर्व कांहिं
न्यून तींत मुळिं नाहीं । मत्सरेंहि पाहतां !
वस्तुवस्तुमात्राला । नाशकाल जरि दिधला,
तरि फिरुनी उदयाला । काल असे तत्त्वतां !
अस्तंगत सूर्याला । सुप्रभात उदयाला,
शुक्लपक्षिं चंद्राला । फिरुनि वरी पूर्णता !
वर्षाऋतु समयाला । प्रतिवर्षीं ये चपला,
प्रतिवसंत वृक्षाला । जन्म नवा आणिता !
भरतीचा नियतकाल । जलधिचे हरित हाल
रात्रीं नक्षत्रजाल । वरि नवी अपूर्वता !
पाहुनि हें नवविकसन । सुप्रसन्न होई मन,
परि विचारि दीनवदन । बालक हा नेणता !
या मदीय चिरनिराश । जीवन्मृत माणसास
पुनरपि उमलावयास । काल दिला कोणता ?