उन्हाळ्यासाठीं पाणी न ठेवून । नदी वेगें जातां पळून ।
भक्कम दगडांचें धरण बांधून । तिला अडवितां येतसे. ॥१॥
अगदीं आपला नेम धरुन । तोफ सुटतां धडधडून ।
हळुच बाजूला सरुन । मारा चुकवितां येतसे. ॥२॥
अंतराळीं कडकडून । वीज घरावरि पडतां तुटून ।
उंच खांबांत बांधून । पाताळीं सोडितां येतसे. ॥३॥
सावकारांनीं वैर धरुन । जप्ती आणितां दावा करुन ।
मागील बाकी देऊन । तिला उठवितां येतसे. ॥४॥
अगदीं नीट रोंख धरुन । म्हैस मार्गीं येतां धांवून ।
एकदम छत्री उघडून । तिला पळवितां येतसे. ॥५॥
जुन्यानव्याची चोरी करुन । भिकार कवि येतां कविता घेऊन ।
कशी तरी एकदां वाचून । त्रास चुकवितां येतसे. ॥६॥
सर्वांस उपाय येत दिसून । परि एका गोष्टीस आहे न्यून ।
तोंडाळ बायको कडकडून । येतां, काय करावें ? ॥७॥