मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
धन्य ! धन्य ! बा , तव स...

राम गणेश गडकरी - धन्य ! धन्य ! बा , तव स...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


धन्य ! धन्य ! बा, तव सुयशाची होतां जाणीव,

सहर्ष वर्षत आशीर्वच कवि "वत्स, चिरं जीव."

परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें,

राग नसावा त्याचा, बाळा ! क्षमा इथें साजे.

आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ !

कशास त्याला उगीच सांगूं "शिष्टनियम पाळ ?"

हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार;

गुण आकर्षणकारण; परिचय केवळ उपचार !

अथवा कविला बंध न कोठें मनिं आणुनि हेंची--

क्षमा करावी, बाळ ! माझिया पुरोभागितेची.

विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान,

तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान.

पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला,

स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला !

स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा !

भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा !

समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती

उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती !

गरीब माझी रसवंती; परि होता अतिहृष्ट

शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरुनि, काढि दृष्ट.

ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट,

सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट.

धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार,

परी तुझ्याही शिरिं भार नव तसाच देणार.

वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा,

आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा.

दिव्य अलौकिक जें जें दिसलें ईशें मनुजाला,

ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला.

ईश्वररुपा जगीं रमे श्री मानवता देवी,

निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवी !

गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा,

वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा.

दंभ, गर्व, अभिमान द्डपुनी पायांनीं अरतीं.

निजपुण्यबळें असा सारखा जा वरतीं वरतीं.

प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई,

क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही !

"मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा,

श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा !"

अशा भावना मनिं ठेवुनियां जा वरतीं वरतीं,

हृदयसागरा सदा येउं दे अमर्याद भरती !

उंच भरार्‍या गगनीं तुजला पाहुनि घेतांना,

परस्परांना दावूं इथुनी डोलवून माना.

धन्य धन्य तुं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता !

हर्षाश्रॄंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां !

फुला उमलल्या ! वास यशाचा नित्य नवा पसरी,

दरवळुनी मोहुनी गुंगवी ही दुनिया सारी !

"विजयी भव, महदायुष्मान् भव, चढवि यशोनाद !"

खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद !

पाप, अमंगल. अनिष्ट किंवा अभद्र जें कांहीं,

स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही.

जें जें मंगल, दिव्य तसें जें, पुण्यहि जें जगतीं,

वृष्टि तयाची होवो, बाळा, सदैव तुजवरती !

नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि,

करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि !

श्रीपरमात्मन् ! मागतसों हें तुजपाशीं एक,

करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक.

असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे.

नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे.

बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्याभंवतीं,

अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं.

किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं,

असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं.

अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड,

क्षमा तयाची करि; कविता ही अशीच रे द्वाड !

हृदयदर्शना कसाबसा हा शब्द पुष्पहार---

’गोविंदाग्रज’ धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार.

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP