मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
अखंड गायन ऐकायातें पंजरां...

राम गणेश गडकरी - अखंड गायन ऐकायातें पंजरां...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


अखंड गायन ऐकायातें पंजरांत धरिला पक्षी ।

उडती लकेर झरतां, जीवा ! नादचित्र केवळ लक्षी ॥१॥

जनसंमर्दीं अलभ्य शोभा पाहुनि, ठसवुनि मनिं घेणें ।

एकांतीं तच्चिंतन करणें; दुःखावेगीं विस्मरणें ॥

दिव्यदर्शनें हृदयपटावर नवरंगांनीं रेखावीं ।

आणि आंतल्या अश्रूंनीं तीं सवेंच धुवुनी काढावीं ॥

अवश्य जीवश्‍वसनें निर्दय निःश्वासांनीं योजावीं ।

हृदयजलानें भरतां नयनें गेली घटिका मोजावि ॥

आद्यंतींचे क्षण सोडुनिया अशेष जीवनिं या देख ॥

परिस्थितीचा रंग काढितां क्षणयुग्मचि उरतें एक ॥

पहिला क्षण तो कीं ज्यावरतीं स्वप्रकाश आशा धाडी ।

दुज्या क्षणावरि तीव्र निराशा छाया प्रेतमया पाडी ॥

आयुष्याचा क्षणाक्षणाचा हिशेब केवळा हा आहे !

परंपरेला त्यांच्या दिधलें नाम मनोहर जीवन हें ॥

रंग बदलुनी खेळत राही अशा क्षणांची ही जोडी ।

स्थलकालाच्या भिन्नत्वानें नित्य नवीं दिसतीं कोडीं ॥

क्षणाक्षणाला जननमरण हें प्राणिमात्र भोगित राही ।

चौर्‍यांशीचा फेरा याविण आणिक दुसरा तो नाहीं ॥

फसव्या पाण्यावरी पोहुनी, दम कोंडुनि मरतां मरतां ।

’गोविंदाग्रज’ म्हणे, - ’जीविता ! लाभ तुझा नच यापरता !’ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP