मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
पंख उभारुनि जरा ॥ भरारा ॥...

राम गणेश गडकरी - पंख उभारुनि जरा ॥ भरारा ॥...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


पंख उभारुनि जरा ॥ भरारा ॥ जा जा उडुनी जा पांखरा ॥

निकट तरुच्या शाखेवरतीं नको बसूं खगवरा ॥पंख....॥

गानमिषानें उडवुं नको रे रम्य नादनिर्झरा ॥

सहवासें तव नव शोभा या खास येत तरुवरा ॥

सुरासुराची लकेर चढतां जलसा येतो भरा ॥

एक एक हा सूर हालवी हृदयाला थरथरां ॥

हिरवी पानें; निळ्या नभाचा वर डोल्हारा खरा ॥

रंगवि संध्या तरल ढगेंही, नाना रंगीं खरा ॥

केला देवें या घुमटाचा सोनेरी पिंजरा ॥

विश्वाचें हें पवनहृदय ते चिरित जाति चरचरा ॥

खिन्न मनीं मम गाणें हें तव वर्षि हर्षनिर्भरा ॥

वाटे हृदयीं जिरवावा हा आनंदाचा झरा ॥

तन्मय होउनि विरुनि मिळावें चिन्मय मंगलतरा ॥

चढया लकेरीसरशीं जावें देवाजीच्या घरा ॥

सोबत घ्यावी तव पंखांची उडती पळती त्वरा ॥

क्षण-सहवासें जीव कोंडला होत असा बावरा ॥

परंतु सारा निर्धन मनिंचा स्वप्नभास हा खरा ॥

विषण्ण मानस; उदास जीवन; पीत निराशागरा ॥

हृदय तडफडें दुःखाग्नीनें मुकलें सुखसागरा ॥

चिरंमृताला गायन हें तव उगाच हलवि जरा ॥

चिरसहवासासाठीं परि मीं पसरितांच मम करा---॥

उडुनी जाशिल भुर्रदिशिं गगनीं खालीं टाकुनि धरा ॥

विश्वगामि तूं चंचल लहरी पवनावर भोंवरा ॥

क्षणांत गिरक्या घेतां घेतां जाशिल रे गरगरा ॥

दूर दूर तें पळतें गाणें करिल मनाचा चुरा ॥

मिळतां लघु सुख अधिक सुखाचा जीव सदा हावरा ॥

तीव्र निराशा होतां होइल फार कि रे घाबरा ॥

ऐकुं न येतां सूर भासभय चिरितिल मग अंतरा ॥

क्षणही माझ्यासाठीं न बसशिल तूं उडत्या पांखरा ॥

इकडे तिकडे फिरशिल टाकुनि येथें या पामरा ॥

जड, निर्जिव मी शोधुं कुठें तुज धरुनि तुझा धोसरा ॥

फुंकर एकचि सृष्टीचा तुज दूरवील खगवरा ॥

क्षणपरिचय हा अशा स्थितीहुनि फारच बरवा खरा ॥

अपूर्व ऐकुनि हर्ष जाहला तोच लाभ मज बरा ॥

सहवासानें प्रेम जडायापूर्विंच पळ, करि त्वरा ॥

हेंच मागणें हात जोडुनी आनंदी पांखरा ॥पंख....॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP