क्षणैक भरतें भलतें वारें । संभ्रमिं बुडतें जग हें सारें ।
कारागृहिंचीं उघडति दारें । समयिं अशा या ।
चुकचुके पाल ही वायां ॥१॥
सजीवतेची उकळी फुटते । बेडी पायांमधली तुटते ।
नसती लाज जनाची सुटते । तोंच भिववाया ।
चुकचुके पाल ही वायां ॥२॥
ओळख निजरुपाची पटते । क्षणभर भेकड वृत्तिहि हटते ।
शक्तिहि सर्वस्वानें नटते । जीव तों घ्याया ।
चुकचुके पाल ही वायां ॥३॥
दृष्टिहि अनंत ठायीं शिरते । बघतां बघतां उलटी फिरते ।
चहूंकडे वा ठायिंच जिरते । विरते माया ।
चुकचुके पाल तों वायां ॥४॥
मर्यादेच्या सीमा सरती । अणूंत सर्वस्वाची वसती ।
’मी तूं’ शून्यामाजीं रमती । वायुमय काया ।
चुकचुके पाल ही वायां ॥५॥
जडतां पारदर्शि जों होई । स्फूर्तिस पद अवकाशहि देई ।
कल्पकता जडरुपा घेई । ब्रह्ममय माया ।
चुकचुके पाल तों वायां ॥६॥
अंधुक जें जें तें लखलखतें । ’असतें’ सहजचि हातीं बसतें ।
नसतें तेंहि मग दिसतें । ठाव ना शून्या ।
चुकचुके पाल ही वायां ॥७॥
होतों सुखी सदा ज्या गांवीं । पुन्हां आठवण त्याची व्हावी ।
नसती व्याद टाकुनी द्यावि । निघावें जाया ।
चुकचुके पाल ही वायां ॥८॥
न दिसे कोठें अंतःकरणीं । नाहीं तैशी वातावरणीं ।
नाहीं कधीं पाहिली कोणीं । ज्या त्या ठायां ।
चुकचुके पाल परि वायां ॥९॥
न कळे चांडाळिण ही कुठली । निशिदिनिं अडवायातें उठली ।
कर्तव्याची चालच खुटली । मार रे मार ।
पाल ही प्रभो अनिवार ! ॥१०॥