राम गणेश गडकरी - “ साध्याही विषयांत आशय कध...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
“ साध्याही विषयांत आशय कधीं मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकनें परि किती होती जगीं आंधळे !
रांगोळी बघुनी इतःपर तरी होणें तयीं शाहणें,”
रोगोळी बघुनीच केशवसुता हें आठवे बोलणें.
रांगोळींत तुझ्या विशेष गुण जो आर्या ! मला वाटतो,
स्पष्टत्वें इतुक्या अशक्य कथनें वाटे मुला काय तो ?
जो तूतें वदवे न अर्थ मनिचा तोंडांत आल तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदीं साध्याच शब्दीं परी.
चैत्रीं आंगण गोमयें सकलही संमार्जिलें सुंदर,
रांगोळीहि कुणीं तिथें निजकरीं ती घातिली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरीं मुळिं नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनीं---
या या ! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थलीं
बत्तासे बहु खोबरें हरभरे खैरात ही चालली !
ठावें कोण न जात येत-दिधलें कोणास आमंत्रणः
नाहीं दाद घरांत ही मुळिं कुणा; दे धीर हें लक्षण.
संधी टाकुनी छान फौज तुमची कोठें पुढें चालली?
बायांनो ! अगदीं खुबी विसरतां तैलंगवृत्तींतली !
नातें, स्नेह, निदान ओळख तुम्हां येथें न आणी तरी,
याः आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्याजणीं या घरीं !
लाभे तें फुकटांतलेंच हळदीकुंकू तुम्हांला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजीं न कित्तीतरी ?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरें उगीच फिरुनी होईल का हो तरी ?
चाले काय असें उगीच भिऊनी ? तुम्हींच सांगा खरें !
या डोळा चुकवून नीट; डरतां आतां कशाला बरें ?
कोणाच्या नजरेंत येइल तरी होणें असे कांहिं का ?
केला का खटला कुणावर कुणीं ऐसा अजूनी फुका !
बायांनो ! तर या, नकाच दवडूं संधी अशी हातची.
जा जें कांहीं मिळेल तेंच भरल्या रस्त्यांतुनी खातची !
कामें हीं असलीं हितावह कधीं होतील का लाजुनी ?
या-या-या तर धांवुनी; त्यजुं नका रीती पुराणी जुनी !
कोणाच्या घरचें असेल हळदीकुंकू कधीं नेमकें
ज्या बायांस नसेल हें चुकुनियां केव्हां जरी टाउकें,
रांगोळी बघुनी इतःपर तरी होणें तयीं शाहणें,
कोठें चालत काय काय अगदीं हें नेहमीं पाहणें !
N/A
References : N/A
Last Updated : November 14, 2012
TOP