मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
पहा फडकला पूर्वदिशेवर ...

राम गणेश गडकरी - पहा फडकला पूर्वदिशेवर ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


पहा फडकला पूर्वदिशेवर रक्तरंग कसला ? ॥

अरुण हाच का ? उषा हीच का ? सांगा कुणि मजला ॥

लालभडक दिग्भाग जाहला मोदें वा खेदें ॥

अनुरागाचा कीं रागाचा रंग नभीं कोंदे ? ॥

विरहजागरण घडलें ज्यांना फार निशाकालीं ॥

त्या नयनांची एकवटुनि का ये सारी लाली ? ॥

रजनीच्या सहवासें सृष्टिंत घडलें जें पाप ॥

होत असे का सृष्टिस आतां हा पश्चात्ताप ? ॥

किंवा कोमल बाला मेली तीव्र निराशांनीं ॥

हृदया फोडुनि तिच्या प्रीतिची लाट चढे गगनीं ? ॥

दुखावलेल्या जळणार्‍या परि हताश हृदयांचे ॥

जे रागाचे, जे सूडाचे, बेत निराशेचे----॥

रात्रीं त्यांचे श्वास चालले मिटल्या डोळ्यांनीं ॥

देवपदीं मग दाद मागण्या रिघती का गगनीं ? ॥

आग लागली किंवा कोठें खालीं पाताळा ॥

उंच दूरवर काय भडकल्या तिच्या अशा ज्वाळा ? ॥

निशापाप निजहृदयीं धरिलें अवकाशें म्हणुनी ॥

पूर्वा जळते पुण्यरवीच्या का पहिल्या किरणीं ? ॥

अन्यायानें रक्त करपतां वाफ काय झाली ? ॥

रक्तनिधिस त्या जग बुडवाया कीं भरती आली ? ॥

मुक्याच इच्छा, आशा झाल्या कोणाच्या खाक ॥

रागानें ही लाल जाहली का त्यांची राख ? ॥

दिनरजनींची धडक मस्तकीं परस्परां बसली ॥

ही दिवसाच्या डोक्यावर का रक्ताची लाली ? ॥

कीं रजनीची टिकल्यासाठीं फाडुनि कांचोळी ॥

जरीपुराण्यासाठीं केली तारांची होळी ? ॥

रविकिरणांचे भाले शिरले आकाशापोटीं ॥

रक्ताचें शिंपणें करी का जखम अशी मोठी ? ॥

कीं पृथ्वीच्या पापश्वासें स्वर्गचि विरघळला ॥

निराधार रस जाउनि भिडतो आतां पाताळा ? ॥

निशा संपवुनि दिन आणाया सकल देव आले ? ॥

रात्र चालवूं या बाण्यानें दैत्य पुढें झाले ? ॥

त्या दोघांचें समर जुंपलें पूर्व दिशाप्रांतीं ॥

हा रक्ताचा सडा फडकवी कीं त्याची ख्याति ? ॥

मृत रात्रीची चिता उषा ही अरुणमया ज्वाला ॥

रविरुपानें प्राणगोल का हा वरतीं आला ? ॥

भ्रमण दिवसभर करुनी संध्यागर्भीं हा प्राण ॥

शिरतां होईल मृतरजनीचा पुनर्जन्म जाण ॥

मरण सकाळीं; सायंकाळीं जन्म पुन्हां घेई ॥

रजनी यापरि भवचक्रावर सदा फिरत राही ॥

फार विचारें कविकल्पकता अति भ्रांत झाली ॥

बालकवीचें ’अरुणगीत’ तों मनीं उडी घाली ॥

जसा निवळवी रंग नभाचा अरुणतेज पार ॥

’अरुणगीत’ ही भीषणतेचा जिरवी हुंकार ॥

वसुंधरेशीं लग्न कराया सूर्य उत्तरंग ॥

ये अरुणाचें हें सोनेरी बांधुनि बाशिंग ? ॥

स्वर्भूसंगम त्या लग्नाचा शुभकर परिणाम ॥

पुण्यमया श्री-वसुधा होइल शुद्धप्रेमधाम ॥

दहा दिशांनो ! जरा जराशा बाजूला सरका ॥

दिशा नवी द्या कायमची या अरुणचित्रफलका ॥

जगन्नायका ! असा एकदां काळ येउं द्याच ॥

निशा नको; दिन नको; असावा अरुण सारखाच ॥

लाल नभांतुनि होइल तेव्हां प्रेमाची वृष्टि ॥

’गोविंदाग्रज’ गानिं रंगविल तीच प्रेमसृष्टि ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP