नाचतां मोर ॥ नाचते पहा लांडोर ॥धृ०॥
कोठें त्याचा भव्य पिसारा ॥ कोठें रंगाचाहि पसारा ॥
कोठें थाटमाट तो सारा ॥ कुठें ही चोर ॥ नाचते.....॥१॥
त्याचा आनंदाचा नाच ॥ दिवे लाविले जाळुनि पाच ॥
कोठें हिरा कुठें ही कांच ॥ तरिहि समोर ॥ नाचते.....॥२॥
जगांत कसरत चाले थोर ॥ तारेवरतीं नाचत मोर ॥
पायीं अपुल्या कच्च दोर ॥ तरिहि छिचोर ॥ नाचते.....॥३॥
कच्चा कुचका तो आधार ॥ केव्हां तुटुनि जाइल पार ॥
फुटतां आब हसतिल चार ॥ नसे हा घोर ॥ नाचते.....॥४॥
जेथें तेथें प्रकार हाच ॥ नाच न नुसत्या मोरांचाच ॥
नाचे मोर कुठें तो साच ॥ बढाईखोर ॥ नाचते.....॥५॥
हलतां सजीव बळकट काया ॥ लागे नसतें झट चिकटाया ॥
भंवतीं भंवतीं छाया ॥ जीव ना जोर ॥ नाचते.....॥६॥
कला निसर्गामागें जाण ॥ माया ब्रह्मांमागें घाण ॥
छाया देवाची सैतान ॥ थोरा पोर ॥ नाचते.....॥७॥
सत्यामागें लागे भास ॥ नक्कल अस्सलास हमखास ॥
तुटली मधें जरि दमसास ॥ तरी बिनजोर ॥ नाचते.....॥८॥
जमाव यांचा जमतां थोर ॥ मोरावरही यांचा जोर ॥
चोरावरती होती मोर ॥ अशी शिरजोर ॥ नाचते.....॥९॥
कमअस्सल या अक्करमाशा । ताज्या रक्ता जळवा बाशा ॥
करिती जगतीं स्वैर तमाशा ॥ रुप अघोर ॥नाचते.....॥१०॥
खोटें नाटें जगीं पसरतें ॥ फारपणानें खरेंहि ठरतें ॥
खरें बिचारें दिसतें भलतें ॥ मग बिजघोर ॥ नाचते.....॥११॥
बघुनी प्रकाअ उलटा असला ॥ येत जगाचा वीट मनाला ।
वाटे विनवावें देवाला ॥ नको तो मोर ॥ आणि ही नको लांडोर ॥ नाचते.....॥१२॥