पन्हाळगडचा पठार सगळा घालुनि पायांखालीं ।
फुलें जमविलीं तर्हेतर्हेचीं जीं जीं हातीं आलीं ॥
शेवंतीचा गेंद हांसरा, शुभ्र मोगरा फुलला ।
मदनबाण हा पाहुनि असला पुष्पबाणही भुलला ॥
नाजुक जाईचीं हीं बाळें; गुलाब ताजा छान ।
हीं इवलालीं रानफुलेंही रंगें हरितीं भान ॥
ही तुळशीची मंजुळ, तैसा सबजा महंमदाचा ।
भू-कमळें हीं, अनंत फुलतां औरच वास तयांचा ॥
किती आणखी सांगूं नांवें---आणि कशाला नुसतीं ?
हेंच पुरें कीं सगळीं होतीं जीं वासें मुसमुसतीं ॥
फुलवंतीनें ओंजळ माझी भरुनी लागे शीग ।
सुगंधि सौंदर्याचा नाचे हातावरतीं ढीग ॥
काव्यभरानें तरुण नयन हे नवतेजानें न्हाले ।
प्रणयरसानें हृदयहि माझें उचंबळुनि वर आलें ॥
"फुले वेंचिलीं---पण-आतां हीं द्यावीं कोणालागीं ?"
राक्षसवृत्ति स्मरणदेवता क्षणांत झाली जागी ॥
"हतभागी हा जीव एकला; प्रीतिदेवता नाहीं ॥
मोडुनि पडलें हृन्मयमंदिर शतधां आघातांही ॥
निष्प्रेमाचें जीवन माझें रुक्ष चिंतनीं जावें ।
संकल्पचि हा वरला ठरला; कां तें दैवा ठावे ।
कांठयांवरि या कोमल हृदया टाकुनि देवा क्रूर ।
कुठें फुलांची धनीन माझी दिली दवडुनी दूर ?
कृतकर्माचीं फळें भोगणें अवश्य जीवा जगिं या ।
गुदस्त तें गुलदस्त; नको तें पुनःपुन्हां मनिं याया" ॥
अभंग निश्चय अशा प्रकारें कितीकदां जरि केला ।
या पुष्पांसम मृदुहि कारणें दुभंगती परि त्याला ॥
वृत्ति बावरी झालि, आंतल्या आंत बिचारी रडली ।
जीवाचीं नयनांतुनि पुष्पें त्या पुष्पांवरि पडलीं ॥
जीव जाहला जड; तीं हातीं पुष्पेंहि जड झालीं ।
"फुलें वेंचिलीं पण-पण-आतां देतों टाकूनि खालीं ॥
चिरंमृताला हवा कशाला हा कसला हव्यास ?
जिवंत फुलवंतीचा असला दुःखप्रद सहवास !
डोळे असुनि अंध असा कुणि तुडविल यांना पायीं ।
रसिक कुणी प्रेमांध उचलुनी अर्पिल रमणीहृदयीं ॥
ज्या देवानें असे मांडिला असला निष्ठुर खेळ ।
असेल त्याला बसवायाचा तसाच कांहीं मेळ ॥
त्यांचीं त्याला फेंकुनि देतों; हें ब्रह्मार्पणमस्तु ।
कुठेंहि पडतां पावतील त्या विश्वचि त्याचें वास्तु ॥
नाजुक असलीं फुलें अशा या माझ्या हृदयासाठीं ।
देवाजवळी दाद मागतिल लागुनि त्याच्यापाठीं."
देत उधळुनि फुलें अर्पितां देवा चहूंकडेही ।
’गोविंदाग्रज’ तशीं फुलें हीं रसिकां तुम्हां देई ॥