दूरस्था जलधीकडे स्वहृदया नेते नदी वाहुनी,
शोधाया रसिकास नित्य कविता हिंडे, न आशा तुटे;
भूलोकावर राहते कुमुदिनी चंद्राकडे पाहुनी,
रात्रीमागुनि धांवतो दिवसही, कीं भेट व्हावी कुठें ?
जीवाचें जगणें असेंच असतें सापेक्ष प्रेमावरी !
डोळेभेट दुरुन ; भाव अथवा आशाहि त्याला पुरे !
मी हें पाहुनि जीवबंधन असें शोकाते होतों परी,
कांकीं या मम लक्ष्यशून्य हृदयीं कांहीं न आशा स्फुरे !
ओठांशीं भिडतें रहस्य मनिंचें---सांगूं कूणाला परी,
अश्रू हे नयनींहि---माळ करुनी घालूं कुणाच्या गळां ?
आलें हें भरुनि रितें हृदयही---देऊं कुणाच्या करीं ?
आला दाटुनि कंठ---हाय ! रडुनी कोठेम करुं मोकळा ?
जी माझ्यास्तव, मी जिचें सकलही; आधार जी जीवनीं
देवा ! भेटवि---दाखवी तरि मला ती कोण देवी जनीं ?