रमणि ! स्मरणीं आमरणचि या हृदयपटावर ठसा
सदाचा ठेविला हा क्षण असा !
भूतभविष्यांमधें तरलतर वर्तमान ज्यापरी
चंचल सीमारेषा धरी;
गतदुःखाच्या भावि सुखाच्या मधें तसा सुंदरी !
क्षण हा संशयरेषेपरी !
गतकालाच्या दुःखाचें हें पळतें पाऊल !
सुखाची येत्या चाहूल !
जरि संशय माझ्या क्षणास या दूषवी,
तरि आयुष्यातेम अवघ्या क्षण भूषवी,
करि दुभंग जीवनदास दे गति नवी;
अनंत सौख्याचा हा होइल आदिकालची तरी,
नातर अंत तरी सुंदरी !