हृदयशारदे ! निर्दय देवी ! ठेव मनीं खोल,
प्रेमशरांनीं मरणाराचे शेवटचे बोल !
नवकवनाची अफू खाऊनी गुंगच होतों मी,
बेसावध टाकिलास वेडया प्रेमाच्या होमीं !
मारिलेंस जैं निजनयनांच्या किरणांचे भाले,
गुंग मनाला चैतन्याचे सौख्य तदा झालें !
ठाऊक नव्हतें परि मज जेव्हां भेदित तीं गेलीं
टोकें त्याचीं प्रेमविषांनीं होतीं भिजलेलीं !
झरत चाललें हृदय सारखे प्रेमविषें न्हालें,
नैराश्याचा धक्का बसुनी गमे ठार झालें !
नयनशरांनीं मम हृदयाच्या बघ चिंध्या केल्या,
फुटलें तुटलें सांधितात त्या आशाही मेल्या !
चिरबिरहाच्या तापानें त्या विलयातें नेल्या,
रंगच्छायाही चिंध्याच्या पार उडुनि गेल्या !
मेलेल्यां आशांची फासुनि राखचि निजींव !
पांघरतो हृदयाच्या चिंध्या हा वेडा जीव !
बडबडतो वाटेल मना तों प्रेमविषें भकला,
ज्या त्या वस्तूमध्यें दिससी वेडया डोळ्याला !
या वेडयाला हासतात बघ हे सारे लोक
हंसोत-परि मग का उरतो हा वेडया मनि शोक ?
निर्दय देवी, हाय ! किती हा केला अविचार,
ह्रदयमंदिरा मोडूनि केलें प्रेमाला ठार !
नयनशरांनीं करितां तुकडे माझ्या प्रेमाचे,
अश्रुरूप नयनांतुनि वाहे रक्त पहा त्याचें !
प्रेमविषानें रक्त करपतां निःश्वासासरशीं
धगधगीत ही वाफ पसरते मिळते वार्याशीं !
त्या वार्यानें भोवतालचें जग हें होरपळे,
सजीव होतें काल मला तें जळे आज सगळें !
हे राखेचें चित्र जसेंच्या तसें पहा त्याचें !
वस्तुवस्तुला घ्याया बघतां राख करीं नाचे !
निर्दय देवी, हसतां हसतां केलें हें काय ?
आग लागली जगास माझ्या, विश्व लया जाय !
कोमल बाला सौंदर्याची प्रेमाची खाण,
जाणुनि हृदयीं झेलुनि घे मी तुझे नयनबाण !
प्रेमयाचना करितां देशी हातहि हातांत
गमलें नव्हतें की तूं करशिल असा पुढें घात !
त्या हृदयाची माती माती यापरि केलीस,
कल्पनेंत मम शिरून आतां पाहत बसलीस !
कां हंससी निर्दये, दावुनी प्रीति अशी फसवी ?
तव शरिं मरणारांची तळमळ काय तुला हंसवी ?
करकमळांचीं दळें दळांशीं लावितांच अंग,
सर्वस्वाच्या भेटीचा तो गमे पूर्वरंग !
प्रेमांधाचा परि विश्वासें धरुनि असा हात,
टाकिलेंस त्या नैराश्याच्या भयाण होहांत !
प्रेमायाचना परिसुनि हंसलिस गालींच्या गालीं
ह्रुदयाच्या रंगाची आली गालावर लाली !
भावि भाग्यसूर्याची माझ्या उषाच ती गमली,
हाय ! निराशारात्रीची या परि संध्या ठरली !
भविष्यकाळामधून माझ्या दिवस पळालाच !
काळ्या रात्रीं काळोखाचा अखंड हा नाच !
आग लागतां हृदया निघती निःश्वासें ज्वाला,
तापुनि लागे काळोखाचा रस उकळायाला !
जळत्या जगांतलीं प्रेमाचीं भूतें हीं सारीं,
रसरसलेल्या काळोखामधिं भाजतात भारी !
ऐक तयाच्या अखेरच्या या भयाण किंकाळ्या,
बहिरें होतें अंगचि सारें बसती कानठळ्या !
प्रेमहि माझें या हृदयींच्या स्मशानांत जळतां,
हें स्मरणाचें भूत नाचतें त्या जागीं आतां !
झाला माझ्या भोंवतालच्या विश्वाचा जाळ,
त्या राखेवर नाचाया मी झालें वेताळ !
जिथें जिथें ही पडते माझी सैतानी द्दषि,
कांहींच्या कांहींच होतसे तिथें तिथें सृष्टि !
रम्य चंद्रिका करपुनि होतो तिचाहि काळोख,
आनंदाच्या या नजरेंनें होत महाशोक !
जळती तारा, फुलें करपतीं, काय कथा यांची ?
निष्प्रेमानें राख जाहली श्रीजगदीशाची !
आग भडकतां ह्रुदयामधला ईश्वरही मेला,
निर्दय देवी, खेळ एवढा पहा तूंच केला !
ही हृदयाची आग भडकती जरा विझायाला,
अश्रुजळांचा समुद्रा गिळिला तरी न तो पुरला !
तुझा पूर्ण मुखचंद्र पाहुनी हृदयसागराला,
पूर्णानंदें भरती आली पूर्ण पौर्णिमेला !
परि तो निर्दय चंद्र न आतां करित रम्य हास्या,
नैराश्याच्या काळोखाची आज अमावास्या !
खळबळुनी हें आलें दुप्पट उधाण दरियाला,
चिरविरहाचा वडवानलही आज उचंबळला !
काळोखाचा अफाट दरिया आकाशीं वरतीं,
काळ्या पाण्याचा हा दरिया हृदयाच्या भंवतीं !
इकडे दरिया-तिकडे दरिया; कोण मूळ काया
कोण कुणाची छाया; खेळे लपंडाव माया !
विरहाग्नीनें हीं पाण्याचीं विश्वें सळसळतीं,
दोन्ही दरियांमधल्या लाटा धडाधडा जळती !
एकमेकिवर आदळतांना किंवा जळतांना,
त्या लाटांतुनि भीषणतेच्या निघती या ताना !
झंझावातावरतीं त्यांचा नाद असा नाचे
सुरामागुनी सूर उसळती माझ्या कवनाचे !
असलीं कवनें गातां गातां निराशांधकारीं,
अर्धामेला येऊन पडलों मरणाच्या दारीं !
तुझा विषारी घाव यापरी अपुर्ताच राही,
सुख तर नाहीं-नसो, परी हा जीवहि नच जाई !
टाक विषारी नजर जराशी पुन्हां एकदांच-पुन्हां
एकदां-पुन्हां विषारी बाणांचा नाच !
काळमुखीं दे लोटुनि ! झालों बहु कासावीरा !
हीच विनवणी तुझ्यासारख्या निर्दय देवीस !
तुफान दरिया असा तयाच्या हलकल्लोळांत,
मरणकाळचीं गाणीं असलीं बसलों मी गात !
ये; कां लाविसि उशिर; एकदां करि पुरता ठार !
निज भक्ताच्या हत्येची तर हौस नुला फार !