शार्दूलविक्रीडित
जें जें या समयीं मनांत भरलें स्वच्छंद नानास्थळीं,
तें तें त्या समयीं जपून धरितां ही होय गंगाजळी !
मित्रा ! ही कविता-न गद्य-इजला निर्बंध कैचा बरें ?
सारें हें मनिं आणुनी मग धरीं ’वाग्वैजयंती’ करें ॥१॥
वसंततिलका
प्रेमें, सख्या धरिं हिला हृदयीं सदाही,
दे टाकुनी; तुडविं ही अथवा पदांही !
मातें दशा समचि या गमतात दोन्ही
माझी मलाच लखलाभ सदा असो ही ॥२॥
तडजोड
एका एक कधीं जसें दिसतसे स्वांतीं विकारांतरें,
अन्या तें न दिसे तसेंच; असतें ज्याचें तयातें खरें;
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट कां हेका धरावा मग ?
एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग ! ॥३॥