मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
वेडा कोणि जगास सोडुनि पळे...

राम गणेश गडकरी - वेडा कोणि जगास सोडुनि पळे...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


वेडा कोणि जगास सोडुनि पळे बाहेर गांवाचिया,

मैदानांत भयाण जाउनि उभा राही; न कांहीं बघे

संध्यारंग नभःपटांत रमती गांवीं न ते त्याचिया

वेडाचे नवरंग चित्तफलका रंगाविती; तेच घे.

त्याचें वेड कशांतुनी उपजलें कोणास हें नाकळें--

त्याचें त्यासहि नाकळे, मज गमे देवाहि ना ठाउकें !

त्याची ती विमनस्कता नच वदे कांहीं जरी आगळें,

वेडयाच्या हृदयास आपण तरी कैसें म्हणावें मुकें ?

व्हावें काय तयास हें समजण्या रस्ता न कांहीं उरे,

शून्या दृष्टि गमे तिच्यांत दिसलें कोणांविशीं प्रेम न !

तोंडाचा पडदा विकार विसरे; बेरंग सारा स्फुरे;

होतें का मग भावशून्य नुसतें ओसाड त्याचें मन ?

छेः ! मैदान उजाड तें; तरि तिथें हा वायु आहेच ना ?

वारें कांहिं तरी तसें घुमवितें ओसाड वेडया मना !

२.

तारा एक तशांत पश्चिमदिशा फोडून बाहेरली.

संध्या कुंकुमिं दिग्वधूच टिकली लावी रुपेरी जणूं !

वेडयानें तिजला भकास नयनीं येतांक्षणीं हेरली;

हांसे भेसुर तो; सवेंच अपुलें हृद्‌गान लागे म्हणूं !

वाटे कीं पडली तिला बघुनियां त्या खूण कांहीं तरी.

तोंडाच्या पडद्यावरि उमटले चित्तांतले खेळ ते !

कांहीं वेळ तसाच पाहि तिजला; एकाग्रता ती खरी

आशा प्रीति तसेंच वेड असलें, यांनाच ती साधते !

तारा आड ढगां-जरा क्षणभरीं झांकून राहे जर

वेडयाच्याहि तरी विषण्ज वदनीं काळीच छाया दिसे !

केला कांहिं विचार - निश्चय; वठे तच्चित्र तोंडावर,

भासे दीपसम स्मशानतिमिरीं तें निश्चयाचें पिसें !

नैराश्यादि विकार तीव्र करिती हा खेळ ऐसा पहा-

आश्चर्यें बघती तयास थिजले डोळे दिशांचे दहा !

३.

किंचित् मस्तक हालवी; पुटपुटे तोंडांतची कांहिंसें

तारास्थानपथें सवेग मग तो चालावया लागला;

हातीं तीस धरीन - निश्चय दिसे; धांवें पुढें तें पिसें !

टाकी सारखिं पावलें झपझपां; नाहीं मुळीं भागला !

काळी घोर निशा; उदास हृदयीं तैशी निराशा जडे--

तारा तारक त्या तमीं; मनिं जसा तो एक आशाकण,

पायांखालुनि जाति डोंगर नद्या - पाही न मागें पुढें;

वर्षें कैक असाच चालत तरी लाभे न तारांगण !

वेडा यापरि जातजात पुढतीं झाला कुठें नाहिंसा !

तारा ती दिसते अजून ! परि हो पत्ता तयाचा कसा !

काळाच्या उदरीं कधीं भटकतां कोणा कुठेंही कसा

वेडा सांपडतां, कथा मज-पुढें झालें तयाचें कसें ?

त्याचें वेड तरी कुणास मिळताम द्या तें मला आणुनी;

माझ्या जी मनिं चांदणी चमकते, जाईन तीमागुनी !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP