करमत नव्हते म्हणुनि एकदा असाच गेलों रानीं ॥
वसंत का-परि ऋतु दुसरा कधिं कुणीं पाहिला कवनीं ? ॥
समोर होता झाडावरतीं एक चिमुकला पक्षी ॥
बोलुनि चालूनि कवि पडलों मी--सहजचि त्याला लक्षीं ॥
वसंत ऋतु तो; रम्य वनहि तें; पक्षि आणि कविराय ॥
तुम्हीच सांगा रसिका, आतां हवें आणखी काय ? ॥
सत्वर कविच्या रसिकपणानें सांगितलें त्या गाया ॥
नवल वाटतें सांगण्या परि-कीं तें गेलें वायां ॥
"वृक्षावरच्या माझ्या मित्रा, कांहीं गाणें गाच ॥
गमतीखातर आणि जरासा इकडे तिकडे नाच ॥
बंधु तुझा मी--माझ्यासाठीं गडया लाग तूं गाया ॥
हें बघ देतों कण धान्याचे कांहीं तुजला खाया ॥
स्तुति गाण्याची तुझ्या बहुपरी करिन चारचौघांत ॥
चित्रहि आणिन तुझें कशाच्या तरी खास अंकांत ॥
गाण्याची या तुझ्या शिफारस करुं अशी भरपूर ॥
कीं शाळाखातेंही वेडया करील तें मंजूर." ॥
अशा प्रकारें फार विनविलें जीव तोडुनी साच ॥
भिकारडें तें कांहीं केल्या परंतु ऐकेनाच ॥
गा म्हटल्या जो गात नसे त्या सृष्टीचा कवि म्हणती ॥
मस्तक फिरलें हातपायही रागानें थरथरती ॥
"एक मारितों दगड असा कीं पडेल वासुनी चोंच ॥"
म्हणुनि वाकलों तसाच खालीं आवेगानें तोंच--
लगबग दिसले स्नेही माझे--संपादक त्या-ह्याचे ॥
म्हणूं लागले, "भले ! तुम्हांला कुठें कुठें पाह्याचें ?॥
या अंकाचा चालू तक्ता (फर्मा) होत नाहिं भरपूर ॥
कामाचा खोळंबा झाला, द्या कांहीं ’मजकूर’॥
वसंत-अंकीं वसंतवर्णनपर कविता चालेल ॥
परंतु झटदिशिं करा; नातरी काम उगिच लांबेल ॥
सरासरी द्या खरडुनि ओळी अठरापासुनि वीस" ॥
ऐकिलें न हें तों कवनाची झाली स्फूर्ति कवीस ॥
झाडावरचा पिसाट कवि तो तसाच टाकुनि रानीं ॥
चला रसिकहो लांबी रुंदी नीट ठेवुनी ध्यानीं ॥
वसंतकाळीं त्या वर्णाया वनांतुनी माघारी ॥
’गोविंदाग्रज’ कवीश्वराची घरीं परतली स्वारी ॥