मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
ये ये ये , आतां ये कविते ...

राम गणेश गडकरी - ये ये ये , आतां ये कविते ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


ये ये ये, आतां ये कविते । नको छळू याहुनि मातें ॥धृ०॥

रसिक मित्र हे जमले भंवतीं रविवारहि गेला ॥

घटका घटका भरत चालली सरत वायदा आला ॥१॥

पाहूं कोठें कविते तुजला; मूढासम झालों ॥

नेत्र मनाचे फाडुनि तुजला शोधाया मी झटलों ॥२॥

गरगर गरगर नेत्र फिरति जणुं चंचलता फिरती ॥

तुज हुडकाया चहूंकडे कीं स्थाना सोडुनि निघती ॥३॥

ऊर धडधडे, हृदय मारि जणुं मुक्या मनाच्या हांका ॥

हृत्पटिं आत्मा नाचत थै थै हट्ट घेउनी तव का ? ॥४॥

काव्यशून्य देहाला विटला; ध्यास तुझा मोठा ॥

वायुरुप हा आत्मा श्‍वासें धांवत बारा वाटा ॥५॥

वस्तुवस्तुमधिं शोधुनिया तुज चित्त बिचारें दमतें ॥

काव्यहीन परि चित्र आपुलें जगदादशीं बघतें ॥६॥

कोठें वससी ? कैशी अससी ? केव्हां येसी कविते ? ॥

ये ये, देतों मोबदला तुज वस्तु कोणती हवि ते ॥७॥

तारांमाजीं चंचलता जी चमकदार लुकलुकते ॥

तीच अससि, तरि हृदयभेद करि पडुनी उल्कापातें ॥८॥

चंद्रमया जरि क्षयकालीं कुठें जरि तरी जी दडसी ॥

तीच, निर्दये ! हपापलेल्या या हृदयिं न कां पडसी ? ॥९॥

रवींत असशिल तरि किरणांचे दोर सोडुनी खालीं ॥

नेत्रगवाक्षांतुनि आत्म्याच्या भरभर शीर महालीं ॥१०॥

फुलांत धरिशी सुगंधमय वा अदृश्यरुपा बरवी ॥

तरि वार्‍याचा घोडा करि त्या हृदयरंगिं फिरवी ॥११॥

मेघमंडलीं जरि तूं बिजली; पड कडकडुनी माथीं ॥

नाद हवा जर नाचाया तर गडगडाट करि साथी ॥१२॥

जरी पर्वतोदरीं दडालिस, तोंड तयाचें फोडी ॥

हो ज्वालेची लाट मानितों त्या रसिंही मी गोडी ॥१३॥

स्त्री-हृदयीं जरि अससी तरि धरिं रस्ता या हृदयाचा ॥

नेत्रकिरणिं तुज पूर देत हा प्रेमाच्या तारांचा ॥१४॥

हाय ! हाय ! कां येशि न अजुनी ? त्रिखंड धुंडुनि झालें ॥

तुजविरहित मम हृदयिं रमाया परब्रह्म बघ भ्यालें ॥१५॥

अंध, मूढतम, शून्यवृत्ति ही मानवता पाही ॥

कुठली वस्तु कुठें टाकिते भान न तिजला कांहीं ॥१६॥

देव दडविला दगडाखालीं, भावा ज्ञानजलीं ॥

स्त्री-हृदयाला तसें दडपिलें सोन्या-मोत्याखालीं ॥१७॥

तीच राक्षसी मानवता तुज न कळे टाकी कोठें ॥

विषय तुझा हुडकावा कैसा ? कोडें पडलें मोठें ॥१८॥

देवामाजीं बससी तरि तो देव पसरला जगतीं ॥

तूंच न दिसती कां मग, देवी ? जीवन तुजविण जगती ॥१९॥

शून्यामाजीं रमसि राक्षसी शून्यवृत्ति अससी ॥

शून्यवृत्ति या मम हृदयीं मग काम नच वद तूं वससी ? ॥२०॥

(चाल) तों नाद विलक्षण उठले ॥ हृदय मम भरलें ॥ चालही बदले ॥

खूण तों मनाला पटली ॥

कीं कवितादेवी हंसली ॥

जी सदाच या हृत्पटलीं ॥

अंतर्दृष्टिसि दिसली देवी, फार मला हंसली ॥

त्या हंसण्याचे नाद निघाले; तन्मयता जमली ॥२१॥

हृदयचि भरलें कवनरसानें, उचंबळुनि आलें ॥

रुप अश्रुमय भरुनि काढितें नयनांचे प्याले ॥

कवनजलाचा ओघ चालला विश्व त्यांत न्हालें ॥

नीरसतेच्या मालिन्याचें नाम नष्ट झालें ॥

वस्तुवस्तुमधिं कवन दिसें मग गावें कवणाला ॥

भांबावुनि बहु जाई कवनीं गाई मीच मला ॥

हा हृदयवसंतचि भला ॥ काय बहरला । जीव उमलला ॥

हृदयाचा केला डोला ॥

कवितेनें आत्मा ओला ॥

त्यावरी बसुनि घे झोला ॥

खोला खोला हृदयपटा; घ्या कवितेचा पूर ॥

कवन भुवन हें कवनचि जीवन; प्या महापूर ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP