मैना भटके वनांत । वेडा राघू झुरतो मनांत ॥धृ०॥
विस्कळले पर, पिसें विखुरलीं, गळले दोन्ही पांख ॥
अखंड झरणी झुळझुळ लाविति अरधे उघडे आंख ॥१॥
हालचालही हरली सारी--कुठलें चारापाणी ? ॥
बसल्या ठायीं खिळून बसला चित्र रेखिल्यावाणी ॥२॥
घुमे पारवा इकडे, तिकडे त्या घुबडाला घूघू ॥
जित्या जिवाची समाध बांधुनि मधेच बसला राघू ॥३॥