मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
जगीं सांगतात प्रीत पतंगाच...

राम गणेश गडकरी - जगीं सांगतात प्रीत पतंगाच...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी ।

झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी ॥

कुठल्याशा जागीं देख ।

मैदान मोकळें एक ॥ पसरलें ॥

वृक्ष थोर एकच त्यांत ।

वाढला पुर्‍या जोमांत ॥ सारखा ॥

चहुंकडेच त्याच्या भंवतें ।

गुडघाभर सारें जग तें ॥ तेथलें ॥

झुडुपेंच खुरट इवलालीं ।

मातींत पसरल्या वेली ॥ माजती ॥

रोज तीं। कैक उपजती । आणखी मरती ।

नाहिं त्या गणती । दादही अशांची नव्हती ॥ त्याप्रती ॥

त्यासाठीं मैदानांत ।

किति वेली तळमळतात ॥ सारख्या ॥

परि कर्माचें विंदान ।

कांहीं तरि असतें आन ॥ चहुंकडे ॥

कोणत्या मुहूर्तावरतीं ।

मेघांत वीज लखलखती ॥ नाचली ॥

त्या क्षणीं।त्याचिया मनीं।तरंगति झणीं ।

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ॥ न कळतां ॥

तो ठसा मनावर ठसला ।

तो घाव जिव्हारीं बसला ॥ प्रीतिचा ॥

वेड पुरें लावी त्याला ।

गगनांतिल चंचल बाला ॥ त्यावरी ॥

जातिधर्म त्याचा सुटला ।

संबंध जगाशीं तुटला ॥ त्यापुढें ॥

आशाहि । कोठली कांहिं । राहिली नाहिं ।

सारखा जाळी । ध्यास त्यास तीन्ही काळीं ॥ एक तो ॥

मुसळधार पाउस पडला ।

तरि कधीं टवटवी त्याला ॥ येइना ॥

जरि वारा करि थैमान ।

तरि हले न याचें पान ॥ एकही ॥

कैकदा कळ्याही आल्या

नच फुलल्या कांहीं केल्या ॥ परि कधीं ॥

तो योग । खरा हठयोग । प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला ।-----लागतें जगावें त्याला ॥ हें असें ! ॥

ही त्याची स्थिति पाहुनिया ।

ती दीड वीतीची दुनिया ॥ बडबडे ॥

कुणी हंसे कुणी करि कींव ।

तडफडे कुणाचा जीव ॥ त्यास्तव ॥

कुणि दयाहि त्यावरि करिती ।

स्वर्गस्थ देव मनिं हंसती ॥ त्याप्रती ॥

निंदिती । कुणी त्याप्रती । नजर चुकविती ।

भीतिही कोणी । जड जगास अवजड गोणी ॥ होइ तो ॥

इष्काचा जहरी प्याला ।

नशिबाला ज्याच्या आला ॥ हा असा ॥

टोंकाविण चालू मरणें ।

तें त्याचें होतें जगणें ॥ सारखें ॥

हृदयाला फसवुनि हंसणें ।

जीवाला न कळत जगणें ॥ वरिवरी ॥

पटत ना । जगीं जगपणा । त्याचिया मना ।

भाव त्या टाकी । देवांतुनि दगडचि बाकी ॥ राहतो ॥

यापरी तपश्‍चर्या ती ।

किति झाली न तिला गणती ॥ राहिली ॥

इंद्राच्या इंद्रपदाला ।

थरकांप सारखा सुटला ॥ भीतिनें ॥

आश्‍चर्यें ऋषिगण दाटे ।

ध्‍रुवबाळा मत्सर वाटे ॥ पाहुनी ॥

तों स्वतां । तपोदेवता । काल संपतां ।

प्रकटली अंतीं । "वरं ब्रूहि" झाली वदती ॥ त्याप्रती ॥

"तप फळास आलें पाही ।

माग जें मनोगत कांहीं ॥ यावरी ॥

हो चिरंजीव लवलाही ।

कल्पवृक्ष दुसरा होई ॥ नंदनीं ॥

प्रळयींच्या वटवृक्षाचें ।

तुज मिळेल पद भाग्याचें ॥ तरुवरा ॥"

तो वदे । "देवि सर्व-दे, । हेंच एक दे-

भेटवी मजला । जीविंच्या जिवाची बाला ॥ एकदा ॥

सांगती हिताच्या गोष्टी ।

देवांच्या तेतिस कोटी ॥ मग तया ॥

"ही भलती आशा बा रे ॥

सोडिं तूं वेड हें सारें ॥ घातकी ॥

स्पर्शासह मरणहि आणी ।

ती तुझ्या जिवाची राणी ॥ त्या क्षणीं ॥

ही अशी शुद्ध राक्षसी । काय मागसी।

माग तूं कांहीं । लाभलें कुणाला नाहीं ॥ जें कधीं ॥"

तो हंसे जरा उपहासें ।

मग सवेंच वदला त्रासें ॥ त्यांप्रती ॥

"निष्प्रेम चिरंजीवन तें ।

जगिं दगडालाहि मिळतें ॥ धिक् तया ॥

क्षण एक पुरे प्रेमाचा ।

वर्षाव पडो मरणांचा ॥ मग पुढें ॥

निग्रहें । वदुनि शब्द हे । अधिक आग्रहें ।

जीव आवरुनी । ध्यानस्थ बैसला फिरुनी ॥ वृक्ष तो ॥

तो निग्रह पाहुनि त्याचा ॥

निरुपाय सर्व देवांचा ॥ जाहला ॥

मग त्याला भेटायाला ।

गगनांतील चंचल बाला ॥ धाडिली ॥

धांवली उताविळ होत ।

प्रीतीची जळती ज्योत ॥ त्याकडे ॥

कडकडे । त्यावरी पडे । स्पर्श जों घडे ।

वृक्ष उन्मळला । दुभंगून खालीं पडला ॥ त्या क्षणीं ॥

दुभंगून खालीं पडला ।

परि पडतां पडतां हंसला ॥ एकदा ॥

हर्षाच्या येउनि लहरी ।

फडफडुनी पानें सारीं ॥ हांसलीं ॥

त्या कळ्या सर्वही फुलल्या ।
 
खुलल्या त्या कायम खुलल्या ॥ अजुनिही ॥

तो योग॥ खरा हठयोग । प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लाभतें मरणही त्याला ॥ हें असें ॥

अनुष्टुभ्‌

स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी

मराठी रसिकांसाठीं ’गोविंदाग्रज’ पाठवी ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP