राम गणेश गडकरी - प्रेमाचीं भाषणें परिसतां ...
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
प्रेमाचीं भाषणें परिसतां किंवा वदतां तद्विषयीं,
तुझी स्मृति क्षणमात्र होत मज, लहरी लाजवि जी हृदयीं !
तुटला आतां ऋणानुबंधचि-कुणी कुणाचें जरि नाहीं,
तरी न विसरे जीव-आपुलें गूढ असें जें मनिं कांहीं !
रविकिरणानें कमल विकसलें-कधीं कुठें तरि केव्हांही !
किरण मरे तें-कमलहि नाहीं-परि झालों तें नच “नाहीं ?
जें झालें तें चित्रगुप्तही लिहून ठेवी स्वगींत,
स्वच्छंदाची जी देवी ती जलवंती ही तें गात !
नवीं बंधनें तुला लाभलीं-आणि लाभतिल तशीं मला,
परंतु गेली पहिली प्रीती-प्रीती प्रतिपद चंद्रकला !
व्यवहाराची बुद्धि मन्मना तुजपासुनि ओढुनि नेई,
मदिरेची ही भ्रष्ट दिव्यता स्वतंत्रता मजला देई !
प्रेमाचें तें चरित्र जेव्हां आम्ही चालूं केलें,
आम्ही रडलों-जग हंसलें-परि जें झालें तें झालें !
References : N/A
Last Updated : November 16, 2012
TOP