मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
आणि जीविता, लाभ हाच का तु...

राम गणेश गडकरी - आणि जीविता, लाभ हाच का तु...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


आणि जीविता, लाभ हाच का तुझ्या संगतीं राहुनियां ? ।
असेंच जाणें असे सदा का कालौघावर वाहुनियां ? ॥
सौंदर्याच्या दर्शनमात्रें जागृत होत्या जीवांत ।
विकल चेतना नाचे नुसती स्वस्थानीं व्हाया श्रांत ॥
जनसंमर्दीं अलभ्य शोभा पाहुनि, ठसवुनि मनिं घेणें ।
एकान्तीं तच्चिंतन करणें; दुःखावेगीं विस्मरणें ॥
दिव्यदर्शनें हृदयपटावर नवरंगांनीं रेखावीं ।
आणि आंतल्या अश्रूंनीं तीं सवेंच धुवुनी काढावीं ॥
अवश्य जीवश्वसनें निर्दय निःश्वासांनीं योजावीं ।
हृदयजलानें भरतां नयनें गेली घटिका मोजावी ॥
आद्यंतींचे क्षण सोडुनियाम अशेष जीवनिं या देख ।
परिस्थितीचा रंग काढितां क्षणयुग्मचि उरते एक ॥
पहिला क्षण तो कीं ज्यावरतीं स्वप्रकाश आशा धाडी ।
दुज्या क्षणावरिं तीव्र निराशा छाया प्रेतमया पाडी ॥
आयुष्याच्या क्षणाक्षणाचा हिशेब केवळ हा आहे ।
परंपरेला त्यांच्या दिधलें नाम मनोहर ‘जीवन’ हें ॥
रंग बदलुनी खेळत राही अशा क्षणांची ही जोडी ।
स्थलकालांच्या भिन्नत्वानें नित्य नवीं दिसतीं कोडीं ॥
क्षणाक्षणाला जनमरण हें प्राणिमात्र भोगित राही ।
चौर्‍यांशीचा फेरा याविण आणिक दुसरा तो नाहीं ॥
फसव्या पाण्यावरी पोहुनी, दम कोंडुनि मरतां ।
“ गोविंदाग्रज ” म्हणे जीविता ! लाभ तुझा नच यापरता ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP