शांत शांत अति बाह्यसृष्टि जरि चोंहिकडे शांत,
हृदयिं करी थैमान सारखा भयाण एकान्त.
क्षणामागुनी क्षण जाउनियां संतत वय वाढे;
देहहि वाढे त्यासहि परि नच हृदय तसें निधडें.
क्रमाक्रमानें नैराश्याचे कडे तयावरतीं
कोसळले किति, तरि, कोमलता होईना कमती.
एकामागुनि एक सारखे होउनि आघात
घाव तयांचे अजुनी ताजे तसेच हृदयांत.
महती आशा, तीव्र निराशा, द्वंद्व हृदयिं करिती;
एकीमधुनी दुसरी निपजे, खळ नाहीं कशि ती.
त्या दोघींचें हृदयभूमिवर समर सदा चाले;
काळ लागला जो त्या समरा जीवन तें झालें.
कडा कडा पडतांना तुटुनी आघातासरसें
हृदयाचें या झालें जाळें राम न त्यांत असे.
तुटतां तुटतां जाळें झालें; भिन्न भिन्न तारा;
तशांतुनीही जोडी त्यांना नशिबाचा तारा.
पुढें निराशा तोडित जाई हृदयाचें सूत;
निर्जिव तरि त्या बांधित मागुनि आशेचें भूत.
तुटतां तुटतां असें आजवर तुटे न कां पार ?
अशा घोंगडीवर हृदयाला कसला आधार ?
नव्या दमाची कोमलताही तशीच का राही ?
नैराश्याच्या दगडसम ती कठिण कां न होई ?
अजुनी पडतां नवा निराशातट हृदयावरतीं
पहिल्याइतके खोल घाव हे कां त्यावर बसती ?
जरा कुठेंसे कोमलतेहुनि हृदय होइ दूर,
तोंच कशाला प्रेमाची ही लागे हूरहूर ?
दुःखामागुनि दुःख भोगुनी मन फत्तर बनतां,
कधींच मेलें प्रेम; पुन्हां तें निपजे कां आतां ?
सहवासानें, अभ्यासानें तीव्र निराशेच्या,
विसरत होतें हृदय भावना सौख्यकल्पनेच्या.
हृदयशारदे ! तशांत टाकिसि उडी कशाला गे ?
भविष्यचिंतनिं मृत आशांची मना कशा लागे ?
न कळतांच मज कसें हृदयिं तूं बसविलेंस ठाणें ?
वश न कुणा जें मन तें वश तुज कसें कोण जाणे ?
पडक्या भिंताडावर हृदयीं कळस उंच असला;
कसें करावें ? हृदयशारदे ! बसूं नये बसला !
ढळला, चळला, तुटला, फुटला, कीं पडला झडला;
सहन करावा कसा पात तो ? जीव इथें अडला.
चढती, पडती; पुरे, सुखाचा पुरे पाठलाग;
नको दिवस तो रात्र धांवते ज्या मागोमाग.
तुझी उपजती आशा मनिंची मनींच चिरडावी ?
कीं विसरुनि अनुभवा, एकदां पुन्हां धांव घ्यावी ?
निराशेंतुनी प्रवास इतका पडला जो पार;
परतावें कां त्यातुनि फिरुनी बिकट जरी फार ?
पूर्वसंचिता ! वद कायमचा का तो सरणार ?
किंवा नशिबीं पहिल्यापासुनि पुन्हांहि येणार ?
सहज जोडिला मित्र तोडितां कष्ट होति फार;
एक तोडितां सखा जिवाचा एक जीव ठार.
प्रेमाची एकदां पुरी जी झाली मनिं होळी,
विसरावी ती किंवा घ्यावी कायमची झोळी ?
भवाब्धिमधुनी कशीबशी जी निघते वर मान
पुरती काढावी ती धरुनी असेंच अवसान ?
किंवा तळिंच्या रत्नांसाठीं द्विगुणित उत्साहें
पुन्हां बुडी मारावी खालीं ? शंका मनिं आहे.
सरतां प्रवास नैराश्याच्या भलाबुरा झाला;
म्हणविल का तो भावि कालचा परी बरा त्याला ?
अशा भावना जीवांभंवतीं घालितात वेढा;
कोण त्यांतुनी काढिल होतां ज्याचा तो वेडा ?
आधीं आशा तुटतां सुटलें बंधन जगताचें;
उदास हृदया वेड लागलें चढत्या कवितेचें.
शब्दशारदा परि तुज लाजुनि आज दूर झाली.
हृदयशारदे ! तुझ्या निशाणा प्रेम घाव घाली.
अशा विचारें तुझी मूर्तिही परि होतां दूर,
खराखुरा एकान्त करी हा हृदयाचा चूर.
कशा भोंवतीं तरि गुंगावें हा हृदयाचा धर्म;
कविता गेली, तूंही जासी, ओढवलें कर्म !
पूर्वीं जग अंतरतां हृदयीं कांहिं तरी होतें;
परि या कालीं तूं त्यजितां मग काय तिथें उरतें ?
अनुभवितों हा, हृदयशारद खराच एकान्त;
भीत भीत आत्माहि बावरे भयाण हृदयांत.
स्थापन करि तव मूर्ति पुन्हां ही हृदयमंदिरांत;
तुजवांचुनि एकटा फिरावा जीव कसा त्यांत.
एकान्ताचें हृदयिं माजलें, सखि ! जें थैमान,
जीव बीचारा जाइ न त्यामधिं; शून्य हृदय जाण
आण दया मनिं हृदयशारदे, चल ये हृदयांत;
शंका विवेक दूर, मरुं दे; दे मजला हात.
चल धांवुनि ये; नको असा हा भयाण एकान्त;
’गोविंदाग्रज’ वेडा तुजविण; करी तया शांत !