अनंत नभ हें वरी पसरलें न मर्या तया;
अनंत मनहि तसें जरि लघू शरीरांत या;
सदैव नभिं खेळती दिनदिशा लपंडाव हा;
मनांतहि तशाच या दिवसरात्र दोन्ही पहा !
उषा विरुनि जात तों प्रकटतो नभीं भास्कर;
नवा दिवस नाचतो नवनव्या जगाच्या वर !
मनात उगवे तसा क्षणिं नवीन आशारवि;
प्रफुल्ल तर कल्पनेप्रति नवीन ये पालवी !
फिरे दिनभरी रवि; प्रकट होई संध्या पुढें;
गमे उदयकाळशी, रविच तो बिचारा बुडे !
तशीच मनिं सारखी वरिवरीच आशा चढे;
गमे क्षणच जाहली सफल, तोंच खालीं पडे !
तमास पसरी निशा मग जगांत जातां रवि;
दिसें सकल शून्यसें, तम नव्या तमा मात्र वी !
विषण्ण हृदयीं तशी भयकारा निराशा जडे;
तमोमय रसा गिळी मन मनीं बिचारें रडे !
तशांत गगनामधें दिसत दूर तारा परी--
मनांतहि सहस्त्रधा फिरत कल्पना बावरी !
पुन्हां उगवतो रवि प्रभवतो प्रकाशा नव;
निराश मनिंही पुन्हां करि तशीच आशा रव !
असें सतत चालतें जनिं तसें मनीं सारखें;
असे हृदयिं आज जें गमत तें उद्यां पारखें !
नको दिवसरात्र तीं न सरती कधीं जी पहा.
सरेल कधिं तो सरो हृदयिंचा लपंडाव हा !