मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
कांहीं लिहावें तुझ्यासाठि...

राम गणेश गडकरी - कांहीं लिहावें तुझ्यासाठि...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


कांहीं लिहावें तुझ्यासाठिं हा विचार मनिं धरुनी ॥

लेखनसाधन घेउनि रात्रीं पडलों निज शयनीं ॥

वाम करावर मस्तक ठेवुनि, लेखनि अन्य करीं ॥

विषय कोणता घ्यावा याचा विचार फार करीं ॥

काठी, जोडा, छत्री, टोपी, ताट, तवा, पितळी ॥

कुत्रें, मांजर, दत्त म्हणोनि येति पुढें सगळीं ॥

पसंत न पडे परी एकही, सर्वां घालविलें ॥

श्रेष्ठ प्रतीच्या विषयास्तव मग मस्तक खाजविलें ॥

मूल, फूल, फळ, संध्या, रजनी, चंद्र, सूर्य, तरुणी----॥

समोर ठाके फौज अशी ही; रुचे न परि कोणी ॥

चर्वित चर्वण होईल, किंवा जुनी कल्पना ही ॥

"येउनि गेली कधींच ही तर, हींत मजा नाहीं ॥

संपादक टाकुनि देइल; ही न कुणास रुचे" ॥

अशा प्रकारें त्रासुनि गेलों; मुळीं मना न सुचे ॥

विषय शोधितां यापरी कवना, नव आले नाकीं ॥

गुंग होउनी नादीं मग मी उभय नेत्र झाकीं ॥

विचार करितां फार यापरि तन्मय होवोनी ॥

विचारब्रह्मीं लीन जाहलों नेत्रद्वय मिटुनी ॥

जागृत होउनि, नेत्र उघडुनी पाहीं मी नादी ॥

तों कळलें कीं रात्र सरोनी उजाडलें अगदीं ॥

लेखनसाधन पाहुनि शयनीं नीट उठुनि बसलों ॥

तोंच होउनी स्मृति रात्रीची स्वतःशींच हंसलों ॥

कशाबशा मग लिहिल्या सत्वर ओळी या चार ॥

धाडित सांप्रत तुजसाठीं या; या तरि स्वीकार ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP