मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
संध्याकाळ सदा उदास करितो ...

राम गणेश गडकरी - संध्याकाळ सदा उदास करितो ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


संध्याकाळ सदा उदास करितो माझ्या अभागी मना ।
त्यानें हर्षत्ति जीवमात्र, परि तो मातेंच दे यातना ॥
नित्याचा क्रम एक हा ठरविला कीं काळ जायाप्रती ।
कोठेंही तरि शून्यवृत्ति फिरुनी, येणें घरा मागुतीं ॥१॥

येतां एक दिनीं असेंच, दिसली वेली कुठेंशी मला ।
होती कांहिं फुलें तिच्यावर, मना आनंद तैं वाटला ॥
घ्यावीं काढुनि दोन तीन म्हणुनी जों जीव माझा भुले ।
वारा वाहुनियां जरा-भरभरा सारीं उडालीं फुलें ॥२॥

वेलीचीं नव्हतीं फुलें-तिजवरी होतीं कुणीं टाकिलीं ।
(प्रेमाचे शुक्रपाठ बोलत नटी, तें आठवे त्या स्थलीं) ॥
कांहीं त्यांतुनि घेतलीं उचलुनी, चालावया लागलों ।
“याचें काय करूं ?” विचार करितां हा मी परि भागलों ॥३॥

कोणी मित्र मला पुढें भटकतां वाटेमधे भेटला ।
प्रेमें ओढुनियां स्वकीय सदनीं तो शीघ्र नेई मला ॥
माझें स्वागत तो करी बहुपरी खेदास न्याया लया ।
ग्रामोफोनहि लाविला; रिझवि तें गाणें मना माझिया ॥४॥

ज्या गाण्यांतिल शब्दसंघ पडला होता मनासारखा ।
गाणाराहि-गळा किती मधुर तो !--- लोकींच या पारखा ॥
अर्थानें तर वेड लागत मना; उत्कर्ष झाला रसा ॥
नाहीं एकच तेवढें ह्रदय तें; हा खेळ दैवा, कसा ! ॥५॥

ग्रामोफोनवरी तेव्हां संतोषें जीव हर्षतां ।
फुलें तीं टाकुनी होई “ गोविंदाग्रज ” चालता ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP