भावगंगा - देह झाला चंदनाचा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
देह झाला चंदनाचा नेत्र यज्ञाची धुनी
'व्हा तुम्ही दादा! शतायु' ये ध्वनी गगनातुनी ॥धृ॥
चालण्यास्तव चरण होते मस्तकीं तूफान होते
कृष्ण-काळे मेघ होते सोबतीला कृष्ण होते
वाट झाली राजरस्ता चालता तिमिरातुनी
होउनी चैतन्यपक्षी सूर्य आला घेउनी ॥१॥
भोवताली भोग होता आंधळा उपदेश होता
पांगळा पुरुषार्थ होता देवही लाचार होता
तीर्थ झाले नीर तुमच्या वाहता नेत्रांतुनी
वेदनांचे वेद झाले आपुल्या श्वासातुनी ॥२॥
शब्द आता स्तोत्र झाले तीर्थयात्रा चालणे
जीवनाची कर्म, भक्ती जान्हवीचे वाहणे
देव-माणुस पाहताना भाव आला उमलुनी
पाहुनी तुम्हास गेल्या मोक्ष, मुक्ती लाजुनी ॥३॥
आज आमुचे नेत्र झाले पेटती नीरांजने
श्वास की हे धूप झाले वंदिती ही तन-मनें
हात अमुचे जुळुनी आले गोत्र जुळता जीवनीं
गात्र अमुचे गीत झाले रंगता संकीर्तनीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP