भावगंगा - क्षणिक दर्शने
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
क्षणिक दर्शने अनंत फुटती आशेला अंकुर
फुलतो भाव मधुर सुंदर ॥धृ॥
ते तेज पसरते सोन्यासम जीवनीं
मधिं गुलाब गोंडस रक्तिम शृंगारुनी
मृदुलता हासते अवखळ नव-यौवनीं
आनंदाच्या अंतिम शिखरी भावांचे माहेर
देते आठव वरचेवर ॥१॥
जरि दिसे मूर्ती ही सरळ, निरागस जना
पाहता चेतती अंतरिच्या भावना
धावती नभाला भेदुन मनकामना
झंझावातीं भडकुन करिती त्रिभुवन अपुले घर
दर्शन फुलला गुल्मोहर ॥२॥
ही तेजोमय जणू शान्त रसाची कला
का चिन्तामणि हा अबलांना लाभला
जणु कल्पवृक्ष हा स्वर्गातुन पातला
न मागता हा ओतित फिरतो अगणित सुविचार
बनावे नारायण हो नर ॥३॥
कधि कुणी पाहिला स्थितप्रज्ञ तो कसा
कधि कुणी पाहिला कर्मयोगी हा असा
कधि कुणी पाहिला गुणातिताचा ठसा
पाहुन घ्या नि समजुन घ्या मनिं भासे योगीश्वर
उतरला स्वर्गातुन ईश्वर ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP