भावगंगा - त्यांची गातो मी आरती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायाचा दीप शुभंकर जगतीं तेजाळिती
त्यांची गातो मी आरती ॥धृ॥
पूज्य, सनातन संस्कृती अपुली
मानव्याचे छत्र, साउली
भगवंता मानुनी माउली, श्रद्धेने डुलती
त्यांची गातो मी आरती ॥१॥
भगवंताची सर्व लेकरें
असती पशु, पक्षी नि वनचरें
भ्रातृत्वे भरती जग सारे, प्रेमे पाझरती
त्यांची गातो मी आरती ॥२॥
पळो तमिश्रा अज्ञानाची
उषा उगवु दे ज्ञान - भक्तिची
ओढ लागु दे प्रभु-प्रीतिची, नित्य सदा सांगती
त्यांची गातो मी आरती ॥३॥
मी देवाचा, जग देवाचे
देवमयी जीवन देहांचे
भेद टाकुनी, सख्यत्वाचे नाते सांभाळिती
त्यांची गातो मी आरती ॥४॥
देवाविण या जगात कोणी
महान नाही, तोच अग्रणी
निश्चित ज्यांचे बोल नि करणी, हात-पाय चालती
त्यांची गातो मी आरती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP