भावगंगा - पणती सानूली
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पणती सानूली मिणमिणती
सदोदित जळते मंदगती ॥धृ॥
सूर्याकडून पाठ सर्वांना मिळतो
मार्गदर्शकाला दाह सतावतो
सूर्याचा संदेश मी, या जगती
पणती सानूली मिणमिणती ॥१॥
बिघडले जग हे कोण सुधारील?
दंभी नि कामचोर असे विचारील
निराशा-तिमीर मी दूर करती
पणती सानूली मिणमिणती ॥२॥
माझ्याने होईल का? नको विचार
शक्ती सारी माझी कामास लावणार
न्यूनगंड ना कधी मजभवती
पणती सानूली मिणमिणती ॥३॥
चहूंकडून भले येवो अंधार
तरी माझा नाही धीर सुटणार
संतान रवीचे मज म्हणती
पणती सानूली मिणमिणती ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP