भक्तीच्या डोळ्यांनी परस्परांना पाहुया
मानव मानव मिळुनी आपण भगवंताला गाऊया ॥धृ॥
कोळी-माळी जातींचे, भेद विसरूया द्वेषांचे
सर्वांचा जो एकच पालक त्याला आपण स्मरुया
त्याला आपण स्मरुया हो, स्वाध्याय करुया ॥१॥
बाजुस ठेवू गप्पांना, मोठ्या मोठ्या थापांना
आचरणाला महत्त्व देऊ बंधु-भगिनी भेटूया
बंधू भगिनी भेटूया हो, स्वाध्याय करुया ॥२॥
नातीं अपुली लोभाची, मैत्री अपुली स्वार्थाची
क्षणाक्षणाला छळती, त्यांना बाजुस आपण सारुया
बाजुस आपण सारुया हो, स्वाध्याय करुया ॥३॥
मान-महत्त्व-वादांचे, कारण मोठे भेदांचे
तटबंदी ही नको सारखी, थोडे काही विसरुया
थोडे काही विसरुया हो, स्वाध्याय करुया ॥४॥
जग हे सारे देवाचे, आहे अपुल्या बापाचे
त्या बापाला मान देऊया, कृतज्ञ आपण राहूया
कृतज्ञ आपण राहूया हो, स्वाध्याय करुया ॥५॥
ज्ञान बुद्धिच्या बोजांचे, भार उतरवू भीतीचे
धीर धरुनी अंतरातल्या प्रेमालाही वळवूया
प्रेमालाही वळवूया हो, स्वाध्याय करुया ॥६॥
विचार करतो म्हणू नका काळ जातसे व्यर्थ फुका
किती राहिलो मागे आपण काळासंगे धावूया
काळासंगे धावूया हो, स्वाध्याय करुया ॥७॥
दिवस पातले संधीचे, प्रत्येकाच्या हिताचे
वेळ दवडता नाशच पुढती नाश आपुला टाळूया
नाश आपुला टाळूया हो, स्वाध्याय करुया ॥८॥