भावगंगा - ही भूमी जगदीशाची
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
ही भूमी जगदीशाची अन् वस्ती सत्पुरुषांची ॥धृ॥
अनंत राजे झाले गेले, अन्ती मुखात माती
उरला एकच राम, राहिली त्याची दिगंत कीर्ती
प्रीती रंगली, भीती पळाली तेव्हा मानवतेची
ही भूमी जगदीशाची ॥१॥
किती गणावे गणनायक हो अगणित त्यांची नाती
पुरात आले हवेत विरले, झाली माती माती !
एक कृष्ण तो गोपीवल्लभ दिसते गीता त्याची
ही भूमी जगदीशाची ॥२॥
कान दिला तर ऐकू येतिल भगवंताचे बोल
वेदमंत्र ते या मातीमधि रुतले अतिशय खोल
प्रशान्त समयी गुणगुणतो हा वारा महती त्यांची
ही भूमी जगदीशाची ॥३॥
मानव्याचे मूल्य सांगते या भूमीची ख्याती
गुणवत्तेला रक्तामधुनी पुष्ट करी ही माती
कर्तव्याची दिशा सांगते, गरजही अध्यात्माची
ही भूमी जगदीशाची ॥४॥
ही पाउस प्याली अनुभव, अनुभव ॠषि-संतांचा
तव प्रसन्नता तर प्रसाद हा, प्रसाद अवतारांचा
स्वाध्याय शिकवि ही माय, ही माय पांडुरंगाची
ही भूमी जगदीशाची ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP