N/Aश्रीगणपती एकदंत विघ्नहरा रे
यश, कीर्ती, सुख, शान्ती तू चतुरा रे ॥धृ॥
सकल जगत तुज नमते प्रथमपदीं रे
तारक तू, धारक तू, हर हारक रे
शब्दब्रह्म तुज म्हणती, वाङ्मयही रे
चारुवाणी उगमच तू संगमही रे ॥१॥
चेतना नि मूर्त ज्ञान तूच साजिरे
मोदमयी ब्रह्मच तू शक्तिरूप रे
गुण न तुला, तनु न तुला, भूत-भावि रे
योगिराज शोधितात चिंतनात रे ॥२॥
विधि-विष्णु-रुद्र-इन्द्र-अग्निदेव रे
सूर्य-चंद्र, ग्रह-तारे सकल लोक रे
भूमि, आप, तेज, वायु, आकाशहि रे
नदि-नाले, वृक्ष-वेली ध्यान धरति रे ॥३॥
रक्तवर्ण, रक्तवस्त्र, रक्तसुमन रे
लंबोदर ! प्रियतम तुज मूषकध्वज रे
वत्सल तू, पूर्णदया, प्रेमनाथ रे
मायेने पांघर मज, शरण तुला रे ॥४॥
भक्तांना रक्षाया सायुध रे रे
पाशांकुश-दन्त-वरद-सहित धाव रे
दे शक्ती, दे बुद्धी, भाव देई रे
तव महिमा गायक मी रक्षि रक्षि रे ॥५॥