भावगंगा - भगवंताला वेडे केले
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भगवंताला वेडे केले गुण कोठुनि आणिले
असले गुण कोठुनि आणिले ॥धृ॥
तुझ्या मुखाने देव बोलला
म्हणती त्याला मुरलीवाला
काय मोहिनी घातलि हरिला,
मधुर मधुर घडले ॥१॥
वेणू तू भाबडी सानुली
चतुराई ना कधी पाहिली
अधरामृत परि प्रभू पाजितो,
अंतरिं साठविले ॥२॥
हलकी हलकी, मोकळी मोकळी,
हृदयीं भरली तुझ्या पोकळी
रंध्रांनी नटले जीवन परि,
हरिला आवडले ॥३॥
श्रवते करुणा तुझ्या सुरांतून
वीररसाला भरती दारुण
भक्तीच्या गंगेचे त्यातुन,
निर्मळ पय भरले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP