मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
श्रीकृष्णाला भेटति दोघे

भावगंगा - श्रीकृष्णाला भेटति दोघे

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


श्रीकृष्णाला भेटति दोघे दुर्योधन अर्जुन
दुष्ट-शक्ति अन्‌ सख्यभक्तिमधि गुरफटतो भगवान ॥धृ॥
निर्मात्याला बंधन मोठे शब्दांच्या अर्थाचे
मनात याचक चिन्तन करतो नित्य नव्या स्वार्थाचे
अर्जुन होता प्रअशांत सागर मर्यादा जाणून
दुर्योधन परि लाभासाठी बसला धरुनी ध्यान ॥१॥
भगवंताचा निर्णय निश्र्चित कधीच कळला नाही
भव्य बुद्धिचा मानव रडतो ती तर त्याची ग्वाही
मागावे ते देवच देतो ते त्याचे महिमान
परंतु स्वार्थामध्ये दडते श्रद्धतेचे ते स्थान ॥२॥
चाहुल घेउन देव बोलतो ‘अर्जुन तू आलास’
मध्येच म्हणतो दुर्योधन हो ‘पहिला मी तर खास’
लीला-लाघव ज्याची जगती त्याला आले भान
एक लाडका सख्यभक्तिचा दुसरा मागे मान ॥३॥
देवाने मग युक्ती योजिली जाणुनी मन दोघांचे
‍सगे तुम्ही मज समान दोघे नात्याचे तोलाचे
वाटप माझे मीच सांगतो घ्यावे निट ऐकून
एक पक्ष मी एकटाच अन्‌ सेना दुसरी महान ॥४॥
विचार पडला सुयोधनाला युद्धाचे तर काम
‍सैन्य घेउनी सोडुनि दिधला जीवनातला राम
मनात झाला खुशी धनंजय ‘पुरे मला भगवान’
यश कीर्ती शोभा मज सगळे अचुक मिळाले वाण ॥५॥
दोघे राजी देवहि गाजी सुखात करिती प्रयाण
प्रभूस माहित भविष्य त्यांचे लपे कुठे अज्ञान
अचूक वाटा देवच देतो तोच सुखाची खाण
समज असावी अज्ञ मानवा ! भक्तसखा भगवान ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP