स्वाध्यायी मी, दैवत माझे भगवान
योगेश्वर भगवान हो योगेश्वर भगवान ॥धृ॥
मायमाउली वत्सलतेची, छाया करितो पितृकृपेची
भ्रातृभावना सख्यत्वाची, योगेश्वर भगवान ॥१॥
सांभाळित जीव पुढती-मागे पंथ दाखवि झरझर वेगे
उकलुनि सगळे अवघड धागे, योगेश्वर भगवान ॥२॥
झोपवी, उठवी, बोलवी, चालवी, क्षमाशीलता त्याची पदवी
जवळी घेउनि शिकवी, हसवी, योगेश्वर भगवान ॥३॥
अन्न पचवितो वैश्वानर तो, जादुगिरीने रक्त बनवितो
स्मृति-विस्मृतिचा खेळ खेळतो, योगेश्वर भगवान ॥४॥
सगळी जगती, अवघे जीवन, माया त्याची, त्याचे निरूपण
अभिन्नतेचे भक्तिरसायन, योगेश्वर भगवान ॥५॥
श्रेष्ठ मानवा ! एकच साधन कृतज्ञतेने करि अभिवादन
देईल तुजला दैवी जीवन, योगेश्वर भगवान ॥६॥