भावगंगा - अभिमान मला आहे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अभिमान मला आहे, अभिमान मला आहे
हृदयात हरी माझ्या अभिमान मला आहे ॥धृ०॥
अभिमान-शून्य झाला तो बेईमान समजा
पशुतुल्य जिंदगी ती येईल काय काजा
प्रभुसाथ नित्य, त्याचा अभिमान मला आहे ॥१॥
सर्वात हरिस प्यारा, सकलांहुनी दुलारा
मी भासलो, कृपा ती अन् घेतला निवारा
त्या प्रेमस्वरूप प्रभुचा अभिमान मला आहे ॥२॥
झालो महान, मोठा हृदयात प्रभू वसतां
क्षण थांबली न भीती, गेली पळून भिरुता
त्या मस्त जीवनाचा अभिमान मला आहे ॥३॥
मी शान ईश्वराची, गरिमा नि गीत झालो
लाचार, दीन नाही, त्याचा बनून उरलो
त्या लाभल्या सुखाचा अभिमान मला आहे ॥४॥
आली भरून छाती, स्वामी प्रभू मिळाला
किती जन्म व्यर्थ गेले! ना भेटलो प्रभूला
ती खंत नाही; त्याचा अभिमान मला आहे ॥५॥
ना याचना, न शंका, निःशंक जीव झालो
झोपाळु पौरुषाला उठवावया निघालो
त्या पूर्वसुकृताचा अभिमान मला आहे ॥६॥
बाहूंत जोश आला, गतिमानता पदांत
उन्मेश मनीं भरला गाठील तो दिगंत
मी ध्येयवादी, माझा अभिमान मला आहे ॥७॥
केल्याविना न मिळते, उठल्याविना न कळते
जो जागतो तयाला प्रभुसाथ नित्य मिळते
त्या सुखद अस्मितेचा अभिमान मला आहे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP