अविनाश पाटील - माझ्या घरासमोर उठला आहे ए...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या घरासमोर उठला आहे एक टॉवर
माझ्या घराच्या खिडकीतून
दिसणारं निळंशार आकाश
त्यानं गिळून टाकलयं !
समोरच्या अंगणात असलेली
शेवग्याची चार झाडं
पांढर्याशुभ्र फुलांनी डवरलेली
सरळमार्गी शेंगांनी नम्र झालेली
धारातीर्थी पडलीत...
या झाडाच्या फांद्याफांद्यांवर
बागडणार्या खारूताई
आता कुठं परदेशी गेल्या आहेत जणू
सासरी गेलेल्या लेकीसारख्या !
टॉवरच्या बाल्कनीत दिसतात आता
वाळत घातलेले
चित्र - विचित्र कपडे
किंवा
सुकण्यासाठी
पसरून खाली सोडलेल्या
रंगीत साड्या
भन्नाट वारा, झिम्माड पाऊस
आता कधी येतो, कधी जातो
कळतच नाही
कारण, खिडक्यांत कोंबलेल्या एसींनी
तोडून टाकलेत नातेसंबंध
कोवळ्या उन्हाशी !
एखादा चुकार पक्षी दिसावा म्हणून मी
कधीचा आसुसलेला आहे
या अनोळखी शहरात
मनाच्या फांदीवर
झोके घेत पक्षी होऊन !
N/A
References : N/A
Last Updated : July 26, 2016
TOP