रमण रणदिवे - उभे आयुष्य अभागी कर्ज फेड...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उभे आयुष्य अभागी कर्ज फेडण्यात गेले
माझ्या सौभाग्याचे कुंकू त्याने हिरावून नेले
आला वैधव्याचा घाला जन्म अश्रूंत बुडाला
चार स्वप्नांचा पाचोळा डोळ्यांदेखत उडाला
उरे अश्रूंचे तोरण माझ्या ओसाड घरात
रोज किंकाळीचा ढोल, रोज अश्रूंची वरात
अरे, आभाळाच्या बापा तुझी करुणा अथांग...
माझ्या चिमण्या पिलांना कशी वाढवू मी सांग ?
पाण्याविना कासावीस माती वैराण, उजाड
कसे पावसा तुझेही झाले काळीज दगड ?
निराधार बाईपण गेले तुटून - मोडून
प्राणापल्याड पळाले रक्त रत्काला सोडून
कातडीला गिधाडांच्या पापी छाया वेढलेल्या...
बरे - वाईट जिवाचे आता करावे वाटते
दीन लेकरांची माया पाय माघारी ओढते
कशी काढू जिंदगानी ? झाले सैरभैर श्वास...
मला वाकुल्या दावून रोज चिडवतो फास !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP