आशा ठिपसे - ‘पोस्टमऽऽन’ हाळी कानी याय...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
‘पोस्टमऽऽन’
हाळी कानी याय़ची
अन् घरात एकदम हालचाल व्हायची
सगळी माणसे दाराकडे धावायची
‘कुणा़चे रे पत्र?’ उत्सुकता असायची
‘आमचे आहे का?’ विचारुन तुला भंडावायची
खाकी पोशाखातला तू
गल्लोगल्ली, घरोघरी फ़िरणारा तु
उन्हातान्हात, थंडी-पावसात न चुकता येणारा तू
वेळ पडली तर आपुलकीने
पत्र वाचूनही दाखवायचास
दमलास तरी कर्तव्य पार पाडायचास
गावाचा तू दूत होतास
माणुसकी तू जपायचास
ढिगाढिगाने शुभेच्छा आणायचास
बहिणीला भाऊबीज पोचवायचास
नात्याला छान गोडवा द्यायचास
कधी सुखाची-आनंदाची झुळुक आणायचास
कधी वादळेही घेऊन यायचास
दिलासा द्यायचास, भावुक व्हायचास,
प्रेमाचा सेतू, जोडायचास
कधी कार्ड, कधी आंतर्देशीय निळे
कधी पाकीट, तर कधी पार्सल निराळे
कधी गरजवंतांना एमओ मिळे
तुझ्या पोतडीचे असे रुपच असायचे आगळे
घरोघरी तुझे स्वागतच व्हायचे
जेव्हा दिवाळीची पोस्त घ्यायला यायचास
कॄतज्ञता दाटायची सगळ्यांच्या मनी
तु आपलाच माणुस वाटायचास
पण आता ई-मेल, व्हाँट्सअँपच्या या जमान्यात
कुठे बरे तू हरवलास?
आँनलाइनच्या झगमगाटात
अगदी भेटेनासाच झालास
माझ्या बालपणीच्या आठवणींत मात्र
आजही तू वसतोस
मनाच्या गल्ली-बोळांतून आजही तू फ़िरतोस...
वाटते,
आजही परतून यावा तो गतकाळ
अन् कानी पडावी पुन्हा तीच हाळी
’पोस्टमऽऽन’
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP