प्रा. मीनल येवले - पदरातल्या काट्यांचे आता ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पदरातल्या काट्यांचे
आता व्हावे विस्मरण
भरभरून स्विकार
बाई, ओटीतले दान
भूत काळाची वादळे
नको आणूस मनात
ठेव जिव्हाळीच्या कळा
ओठी दाबुनिया आत
जुने आठवत काही
नको गाऊ दुःखगाणी
आता त्याच्याही हलेल
थोडे पोटातले पाणी
अपरूप वेळ अशी
पुन्हा नाही यावयाची
अंगणात उतरेल
किलबिल पाखराची
जडावल्या पावलांना
तुझे तूच जपायाचे
उभ्या जन्माच्या दुःखाला
आता सुख म्हणायाचे!
घरादाराला लागली
त्याची पैंजणी चाहूल
किती दिसांनी आलेले
जप उंबराचे फूल
जुन्या जखमांना लाव
थोडा हळदीचा लेप
क्षण आले भरूनिया
घ्यावी रिचवून खेप
तुझ्या एकेका श्वाशासी
त्याची जुळलेली नाळ
बहरूनिया येईल
तुझ्या भविष्याचा माळ!
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP