ओमप्रकाश सारस्वत - राहू दे ही अशीच गहन गोपनी...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
राहू दे ही अशीच
गहन गोपनीयता
तुझ्याविषयीची
प्रकटण्यात काय अर्थ आहे ?
अप्रकतच राहा तू
तसं नाही झालं तर
सोडून द्यावं लागेल मला
कल्पना करणं
जोपर्यंत राहशील दूर
मैलोन् मैल दूर
तू माझ्या जाणिवेपासून
तोपर्यंत मी
अत्यंत तीव्रतेनं, अत्यंत वेगानं
तुझ्या जवळ येण्यासाठी
चालत राहीन सतत
मात्र हे प्रियतम,
तुझी गूढता जाहीर करून
अवतरू नकोस तू
माझ्या पावलांची गतीच खुंटेल नाहीतर
तू राहा तिकडं कुठंतरी दूर
कुठल्याशा गूढ पडद्याआड
आणि मी इथं
जोपासत राहीन आपल्यातला स्नेह
दुराव्यामुळंच होत असतो स्नेह प्रगल्भ !
दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर
होणार्या भेटीत, होणार्या मीलनात
जो आनंद असतो,
तो त्वरेनं घडणार्या दर्शनात
कधीतरी असू शकेल काय ?
तेव्हा राहू दे
तुझं आणि माझं प्रेम असच
अप्रकट, अव्यक्त !
तू बनून राहा माझा आराध्य देव
आणि मी राहीन बनून तुझा पुजारी...सदोदित
मी सतत गात राहीन
तुझ्या विरहाची गाणी
आणि गात राहीन मी
तुझ्या मीलनाचे मंगलमय तराणे
मात्र, होऊ नकोस तू प्रकट
अवतरू नकोस प्रत्यक्षात
नाही तर विनष्ट होऊन जाईल
तुझ्याविषयीचा माझा ध्यास !
तुझ्याविषयीचा माझा ध्यास !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP