श्रीधर नांदेडकर - अंधारून येतं अचानक आयुष्य...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अंधारून येतं अचानक
आयुष्याच्या झाडावर लगडतात
दुःखाचे लाख काजवे
सुखाचा सदरा ओढतं
पाठीमागून कुणीतरी
जसं ‘ पाऊस आला, पाऊस आला ’
म्हणत
हरखून निजलेल्या गावाला
पोटात घेतो खचलेला डोंगर
रात्रीच्या तिसर्या प्रहरात
मातीत रुजलेलं बी
उगवून येण्याचं स्वप्न पाहत
झोपेत हसणारी माणसं
चिखलात खोलवर रुतून बसतात
या रडणार्या मुलाला
कसं समजवणार
मातीतून उगवत असतं बी
उगवत नसतो माणूस
हिरवे लुसलुशीत कोंब होऊन आता
जगवणार नाहीत कधीच
तुझे माय - बाप या धरणीवर
काळ्या आईच्या कुशीत
ते कायमचे निजले आहेत
चिखलातून एक एक पाऊल
पुढं टाकत
रडणार्या मुलासाठी
तळघरातून केलेल्या
प्रार्थना असतात आपल्याजवळ
आपण त्याला हाक मारू शकतो
आपण सुख होऊन
त्याच्या अंगावर लोंबणारा
दुःखाचा सदरा ओढू शकतो
आपण ठरवून बघू शकतो
आपल्या घोंगडीवर उमटणारे
त्याच्या पावलांचे चिखलठसे
खरं तर पावसात भिजलेल्या
पाखरासारख्या त्या मुलाला
आपण कुशीत घेऊ शकतो
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP