मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
अर्थबोध व्हायचा नाही मला ...

अमोल अहेर - अर्थबोध व्हायचा नाही मला ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


अर्थबोध व्हायचा नाही मला
जेव्हा आई म्हणायची :
“ आपली ताई हळदीचं रान आहे...”

कप, ग्लास वगैरे
फ़ुटायचे माझ्याकडून
पण ताई म्हणायची : “ माझ्याच हातून पडले ”
त्यामुळं कधी फ़ुटलं नाही
माझ्या धांदरटपणाचं भांडं !

दंगा - मस्तीत कपडे उसवायचे माझे
पण ताई शिवून द्यायची
आई - बाबा यायच्या आत
त्यामुळं फ़िरायची नाही संशराची सुई
अन् सापडायचाही नाही
कपडे फ़ाटल्या - उसवल्याचा धागा - दोरा !

शाळेत मार्क कमी पडायचे मला
पण ताई म्हणायची
“ रागावू नका बाबा. अपाला भैया चित्रकलेत अव्वल
आहे...”
मला तर आठवतही नसायचं
मी कधी चित्र काढलेलं...
पण ताईचं ऐकून
माझ्या चेहर्‍यावरच्या कॅनव्हासवर
पंजा उमटवण्याचा इरादा
बाबा मागं घ्यायचे !

मध्ये बरीच वर्षं निघून गेली
माझी गाडीही आता रुळावर आली

परवा हाताला खरचटलं माझ्या
फ़ार आग आग झाली
बायको म्हणाली :
“ हळदीचा लेप लावा...लगेच बरं वाटेल. ”

तेव्हा मला उमगलं
आई तसं का म्हणायची ते :
“ आपली ताई हळदीचं रान आहे...! ”


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP