प्रवीण दवणे - चंदनज्योतीची एक चाहूल उजळ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
चंदनज्योतीची एक चाहूल उजळते
नि जागा होतो आसमंत
तेजाचा गाभारा गंधित करत
उटण्याच्या स्पर्शात सहज मिसळलेलं वात्सल्य
थरारून टाकतं सारं जीवन
नि जागवतं उमलताना संजीवन !
रंगावलीतून प्रकटत राहतो एकेक चेहरा
मुक्या मनांचा
नि त्यातून सूर छेडतात नात्यांचे अनुबंध !
गारव्यातून
झुलत राहते भूपाळीची ऊब
कालच्या काळोख्याला
प्रकाशाचं आश्वासन देत !
तबकातून बोटावर उतरणारा ओला टिळा
सजवू लागतो भाळ, आभाळाचं !
आणि होत जातं प्राक्तन
भाग्योदयाचं क्षितिज !
पंचसंवेदनांना साद घालत आला आहे
दीपोत्सव...हस्तांदोलन करत
स्रुजनभूमीतल्या प्रत्येक अंकुराशी मैत्र जोडत
घराची भिंत आतिथ्याच्या
औदार्यानं होत जाते क्षितिज दूर
उपेक्षितांना कवेत घेत
आसवांना देत राहते दीपावली
नव्या स्मितांचं प्रगाढ आश्वासन !
अंगणाला दीपोत्सव
हलकेच प्रकटत राहतो चैतन्याच्या
प्रत्येक विभ्रमावर
पुसल्या जातात सार्या रेषा आणि
जोडत राहतात अंतःकरणं
मानव्याच्या अथांग मंडपाखाली...
हे दीपावली...
तू माउली...साउली...निरागसाच्या चाहुली
तू नित्य बहरत राहा चिरंतनाच्या
शपथेनं जन्मलेल्या प्रत्येक चोचीला
चार्याचा घास देत
देत राहा मनःशांतीचं, आरोग्याचं
अगदी प्रत्येकाला प्रकाशदान... !
हेच या लक्ष लक्ष हृदयाचं
विश्वात्मक पसायदान...प्रकाशदान !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP