गिरिजाकुमार माथुर - आज या उदास संध्याकाळी मी ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आज या उदास संध्याकाळी
मी जुनेर, मळके कपडे
पुढ्यात घेऊन बसलो आहे...असाच
कुठल्यातरी कामात
मन रमवायचं म्हणून...
कपडे हाताळता हाताळता
त्या जुनेर्यात आढळला
एक रेशमी कुडता
कुडत्याच्या सुरकुत्यांमध्ये
अडकून राहिला होता
बांगडीचा एक झगझगीत तुकडा
तो अचनक खाली पडला...
मीलनाच्या त्या मधुर रात्री
तुझ्या गोर्या हातांत
तू ज्या बांगड्या
भरलेल्या होत्यास
त्या बांगड्यांपैकीच
एकीचा हा तुकडा
मग तंद्रीच लागली माझी
आणि मला आठवत गेली
गतकाळातील एकेक गोष्टी...
द्वितीयेच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या
त्या बांगडीच्या तुकड्यातून
तरळू लागल्या
तुझ्या कितीतरी भावमुद्रा...
आठवू लागली ती रात्र...
ती शेज...
तुझा जवळ घेताना
बांगड्या हातातून
खाली ओघळून झालेली
ती त्यांची किणकिण...
सरून गेल्या त्या सगळ्या
स्वप्नवत् रात्री...
आणि आता
आठवणी जागवण्यासाठी
उरला आहे सौभाग्यचिन्हाचा
म्हणजेच बांगडीचा हा तुकडा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP