मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
काय आहे नेमके हृदयात सूर्...

नीलेश कवडे - काय आहे नेमके हृदयात सूर्...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


काय आहे नेमके हृदयात सूर्याच्या ?
दुःख जळते कोणते गर्भात सूर्याच्या ?

सारख्या मारून सूर्याभोवती फेर्‍या
घालतो का भर शनी दुःखात सूर्याच्या ?

उंच धांडा चालता शेतात ज्वारीचा
भूक जळते का तिथे पोटात सूर्याच्या ?

तह सलोख्याचाच ग्रह - तार्‍यांमधे होतो...
रात्र चंद्राला, दिवस हिश्शात सूर्याच्या !

बंड एका वेदनेचे अंतरी झाले...
जन्मले मग विश्व हे स्फोटात सूर्याच्या !

दुःख सूर्यासारखे हृदयामधे जळते -
- बसते ऐटीत दरबारात सूर्याच्या !

वेदनेचे तेज हे की आणखी काही... ?
वलय चंद्राला नवे ग्रहणात सूर्याच्या... !

घेतला मग पेट विझलेल्या मशालींनी
पाहिल्यावर काजवे सैन्यात सूर्याच्या !

ओढुनी धरती उन्हाचा पदर डोक्यावर
नाहते ती केशरी रंगात सूर्याच्या... !

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP