धनंजय नर्हे - त्या झाडाच्या वठलेल्या फा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
त्या झाडाच्या वठलेल्या फांदीवर
तिनं भूक टांगून ठेवली पिशवीत
बाजूच्या फांदीला टांगलेल्या पाळण्यात
झोके घेतोय तिचा इवलासा जीव
अधूनमधून बघतोय तिच्याकडे
आशाळभूत भुकेल्या नजरेनं
ती करते त्याच्याकडे कानाडोळा
पान्हा आटलाय आता
अन् तान्हाही झोपलाय उपाशी
अनवाणी पायांनी वेचते ती कापूस ती भर उन्हात
पाण्याचा लवलेश नाही
पाणी आहे ते फक्त तिच्या डोळ्यात
तेही आता आटून जायच्या मार्गावर
एकटीच राबते आता ती
या एकट्या वावरात
हिमतीनं लढतेय एकेका दिवसाशी
अन् एकेका रात्रीशी
पोटात आग पडते तेव्हा
पिशवीत टांगलेल्या भाकरीकडं
नाईलाजानं बघते फांदीवर
याच फांदीला स्वत:ला लटकवून
तो सुटला होता काल-परवा
तिच्या पांढर्या कपाळाची अन्
पाळण्यातल्या जिवाची पर्वा न करता....
तिलाही वाटलं आपणही घ्यावं
स्वत:ला तिथंच लटकवून....
पाळण्यावर तिची नजर जाताच
झोपेतून उठलेला तान्हा
खुदकन् हसला तिच्याकडे पाहून
आणि सगळं विसरून
तीही हसली....
पण काहीशी विचीत्र.....!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP