मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कुणाच्याच कसं आलं नाही लक...

फ़ेलिक्स डिसोजा - कुणाच्याच कसं आलं नाही लक...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कुणाच्याच कसं आलं नाही लक्षात
की अनेक दिवसांपासून ती झालीय नि:शब्द

तिच्या सतत उघडझाप करणार्‍या डोळ्यांत
शिल्लक आहे ओलावा न् बुबुळांत
मिणमिणता
दिवा, जो कुठल्याही क्षणी विझून
जाण्यासाठी
करतोय धडपड

तिच्या सगळ्या हालचाली
सुरकुत्यांनी भरलेल्या शरीरापुरत्याच
आहेत शिल्लक

बोलण्यासाठी म्हणून तिचे ओठ
उघडत नाहीत. थरथरतात नुसते.
जणू स्वत:ला वाचवण्यासाठी झालीय
तिची झटापत न् काळानं पराभूत करून
काढून घेतलीय
तिच्या स्मृतीतून तिची भाषा

ती पाह्त राहते डोळ्यांतला दिवा जपत...
घरभर ओळखीचं काही गवसेल, या
आशेनं चाचपडात राहते
तिला दिसत नाहीत माणसं
दिसतात माणसांचे आकार
तिला ऐकू येत नाहीत शब्द

ऐकू येतात आपल्या भाषेत गुदमरलेल्या
तिच्या शब्दांच्या आशयांकित हाका

ज्या तिला बोलावतात तिच्या
आठवणींतल्या दिवसात
मात्र, पंखातलं बळ गमावलेली स्मृतींची
पाखरं
उतरू शकत नाहीत तिच्या हास्याच्या
अंगणात
आदळली जाते ती विसाव्या वर्षाच्या
खडकावर
जिथं गरहलीसकट विस्कटला होता तिचा
संसार...
तद्नंतर अनेक वर्षं ती जपत राहिली
चुलीतला जाळ
विझवीत राहिली पोरांची भूक
सांभाळावा लागला तिला एक पांढरा रुमाल
जो बळजबरीनं लादला गेला होता तिच्या
खांद्यावर
क्रूसासारखा !

तिच्याकडं पाहिलं की वाटतं,
किती भयानक आहे
घरातल्या घरात निर्वासित व्हाव लागणं...
कुठल्या तरी आठवणीच्या खडकावर
बसून आहे ती

जिथून तिला परतता येत नाही आपल्यापर्यंत
आणि आपणही पोचू शकत नाही तिच्या
आठवणींच्या प्रदेशात

वाळूच्या रंगासारखं दिसणारं तिचं शरीर
म्हणजे
तिच्या आयुष्यावर साचलेलं वाळवंटंय आणि
आत अजूनही जिवंत आहेत दु:खांचे झरे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP